जरा हटके! वर्ध्यात सैनिकांसह कुटुंबियांना देणार मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 02:29 PM2018-11-27T14:29:22+5:302018-11-27T14:31:55+5:30
देशाच्या सीमेवर २४ तास ३६५ दिवस तैनात राहून कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटंबियांना खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचाने पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाच्या सीमेवर २४ तास ३६५ दिवस तैनात राहून कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटंबियांना खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचाने पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी मुंबई हल्ल्याच्या दहाव्या स्मृतिदिनी घोषणा केली आहे. तसेच सीमेवरून रजा काळात गावी येणाऱ्या सैनिकांना रेल्वे स्थानकापासून त्यांच्या गावापर्यंत वाहनाने सोडून देण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. याला वर्धा शहरातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांचे मोठे योगदान लाभले आहे.
देशाच्या विविध भागात सैनिक सध्या कार्यरत आहे. देशाच्या सीमेवर तैनात राहुन देशातील लोकांची सुरक्षा करण्याचे काम सैनिकांकडून करण्यात येते. या सैनिकाप्रती आपली सामाजिक जबाबदारी म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचाने सैन्य दलात असलेल्या सैनिक, त्यांचे कुटुंबिय तसेच सैन्य दलातून निवृत्त माजी सैनिक यांना आयुष्यभर उपचार, तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणीचीही कोणतीही फी घेतली जाणार नाही. अशी माहिती वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे सैनिक कुटंूबातील सदस्यांनी दवाखान्यात येताना आपले ओळखपत्र, तत्सम कागदपत्र सोबत बाळगावे असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. वैद्यकीय जनजागृती मंचाद्वारे मागील तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंूबासाठी दिलासा कार्ड मोहिम राबविण्यात येत आहे. वर्धेतील १५ ते २० खासगी डॉक्टर आपल्या रुग्णालयात या दिलासा कार्डाच्या आधारे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंूबातील सदस्यांवर उपचार करीत आहे.
सैन्य दलात असलेल्या सैनिक, त्यांचे गावात राहणारे कुटंूबिय, सेवा निवृत्त झालेले सैनिक यांना वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्य असलेल्या डॉक्टरांच्या खासगी रुग्णालयातून मोफत उपचार देण्याबाबत २६/११ च्या हल्ल्यातील दहाव्या स्मृतिदिनी निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सैन्यातून रजेवर घरी जाणाऱ्या सैनिकाला स्टेशनपासून त्याच्या गावापर्यंत डॉक्टरच्या गाडीतून सोडून देण्याची व्यवस्थाही वैद्यकीय जनजागृती मंच करणार आहे. या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.
डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा