बस रोखून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:52 PM2019-07-08T21:52:08+5:302019-07-08T21:52:25+5:30
चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
सोमवारी ११.०० वाजताच्या सुमारास वर्धा-हमदापूर ही बस शिवनगर येथे पोहोचली. काही प्रवासी घेऊन आणि अन्य विद्यार्थी व प्रवाशांना तिथे सोडून चालकाने बस पुढे काढली. या प्रकाराने बसखाली राहिलेले प्रवाशांचा पारा चांगलाच चढला. ही बाब लक्षात येताच मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी सदर बसचा पाठलाग करून वाहन कालव्याजवळ थांबविले. दरम्यान संतप्त प्रवाशांनीही तेथे गर्दी करून आपला रोष व्यक्त केला. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना बसमध्ये का घेतले नाही, असे म्हणत संतप्तांनी चालक व वाहकाला चांगलेच धारेवर धरले होते. या प्रकाराची माहिती मिळताच यंत्र अभियंता नेवारे, आगार व्यवस्थापक पल्लवी चोकट यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात देऊळगावचे सरपंच अश्वजित चाटे, सूरज कडू, उपसरपंच पद्माकर टोणपे, धनराज पोकळे, गौरव कुंडलवार, देवेंद्र पाठक, नितीन धोबे, सुभाष झाडे, वैद्य, अमोल पन्नासे आदी सहभागी झाले होते.
लोकांशी चर्चा करण्यात आल्यानंतर हमदापूर येथे चालक व वाहक यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रवाशांनाही विचारले. शिवनगर बस थांब्यावर बस थांबून प्रवासी उतरले आणि चढले. कदाचित काही राहून गेले असेल. गैरसमजुतीतून प्रकार घडला आहे.
- पल्लवी चोकट, आगार व्यवस्थापक, वर्धा.