रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस बंद
By admin | Published: July 5, 2017 12:26 AM2017-07-05T00:26:31+5:302017-07-05T00:26:31+5:30
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
माणिकवाडा-तारासावंगा रस्ता : प्रवास ठरतोय जीवघेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून प्रवास जीवघेणा ठरत आहे. दररोज नुकसान होत असल्याने या मार्गावरील बससेवाही बंद कदण्यात आली आहे. परिणामी, ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहारच प्रभावित झाले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच रत्नपाल पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
वर्धा-अमरावती-नागपूर या तीन जिल्ह्यांच्या सिमा तारासावंगा गावाजवळ आहे. या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, गावकरी सर्व प्रकारच्या वाहनांनी प्रवास करतात. ४ पैकी १ किमी रस्ता व्यवस्थित आहे; पण उर्वरित ३ किमी रस्त्यावरील सरफेस पूर्ण उखडला आहे. यामुळे दुरूस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत जि.प. बांधकाम उपविभाग आर्वीचे उपअभियंता अनिल भडांगे यांच्याकडे अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. त्यांनी निधी नसल्याचे सांगत वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यानंतर लगेच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होण्याची अपेक्षा सरपंच रत्नपाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. तत्सम मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
जि.प. बांधकाम विभागाविरूद्ध ग्रा.पं. चा ठराव
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात गावकरी एकवटले आहे. रस्त्याची दुरूस्ती होत नसल्याने ग्रामपंचायतीने जि.प. बांधकाम विभागाविपरूद्ध ठराव घेतला आहे. सदर ठराव सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठविण्यात येणार असल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे.
निधी नसल्याचे कारण देत माणिकवाडा ते तारासावंगा रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक, जिल्हा परिषदेकडून निरूपयोगी साधनांवर अनाठायी खर्च केला जातो. ही बाब ग्रामस्थांच्या जिव्हारी लागत असल्याचे दिसते.
खासगी वाहनांचा आधार
तारासावंगा गावाला जाणाऱ्या बसफेऱ्या रस्त्याच्या त्रासापायी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सकाळी व रात्री अशा मोजक्या बसेस येतात. परिणमी, दिवसभर प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही. याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे.