‘कदम’ कुटुंबीयांनी लावला मोबाईल टॉवर कंपनीला कोटींचा चुना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 05:00 AM2022-03-18T05:00:00+5:302022-03-18T05:00:07+5:30
अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या कदम कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि याच अतिक्रमण जागेवर सुरक्षा भिंत बांधल्याचे पुढे आले. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अतिक्रमणीत जागेवरील सुमारे २५ वर्षे जुनी कदम हॉस्पिटलची सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. हीच अतिक्रमण माेहीम राबविली जात असताना सुरक्षा भिंतीच्या आत एक टॉवर असल्याचे पुढे आले.
महेश सायखेेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटल मधील नियमबाह्य गर्भपातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तर याच कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अतिक्रमण जागा आपलीच असल्याचे भासवून एका मोबाइल टॉवर कंपनीला कोटींचा चुना लावल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी अद्यापही टॉवर कंपनीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी आर्वी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हे वास्तव उलगले आहे.
बायो मेडिकल वेस्टची स्वत:च विल्हेवाट लावली जात असल्याने आर्वी येथील कदम हॉस्पिटलला आर्वी नगरपालिका प्रशासनाने यापूर्वी दंडात्मक कारवाई का करू नये? असा नोटीस बजावला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आर्वी नगरपालिका प्रशासनाने कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी अतिक्रमण तर केले काय याची शहानिशा केली. याच शहानिशेदरम्यान अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या कदम कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि याच अतिक्रमण जागेवर सुरक्षा भिंत बांधल्याचे पुढे आले. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अतिक्रमणीत जागेवरील सुमारे २५ वर्षे जुनी कदम हॉस्पिटलची सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. हीच अतिक्रमण माेहीम राबविली जात असताना सुरक्षा भिंतीच्या आत एक टॉवर असल्याचे पुढे आले. अधिकची माहिती घेतल्यावर हे टॉवर आर्वी नगरपालिकेच्या खुल्या जागेवर असल्याचे पुढे आले. शिवाय त्यावर पालिकेचा कर थकित असल्याने हे टॉवर पालिका कर्मचाऱ्यांनी सील केले आहे. एकूणच आर्वी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान खोटी बतावणी करून कदम कुटुंबीयांनी टॉवर कंपनीची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. तर आता सदर टॉवर कंपनीचे प्रतिनिधी पोलीस कचेरीत पोहोचत तक्रार फसवणुकीबाबत तक्रार नोंदवितात काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कदमांचा टॉवर कंपनीसोबत करार
- अतिक्रमणित जागेवर मोबाइल टॉवर निदर्शनास येताच पालिकेच्या नगर रचनाकार विभागाने अधिकची माहिती घेतली. याच अधिकच्या माहितीदरम्यान डॉ. कुमारसिंग कदम यांनी टॉवर कंपनीसोबत करार करून काही वर्षांसाठी अतिक्रमणित जागाच भाडेतत्त्वावर दिल्याचे पुढे आले आहे.
कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून सुरक्षा भिंत बांधल्याने नियमानुसार ही सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने मंगळवारी पाडण्यात आली आहे. याच सुरक्षा भिंतीच्या आत अतिक्रमणित जागेवर एक मोबाइल टॉवर असून, त्यावर मोठा कर थकीत असल्याने टॉवर सील करण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कदम यांनी मोबाइल टॉवर कंपनीची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. हे मोबाइल टाॅवर पालिकेच्या मालकीच्या जागेवर असल्याने त्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- विजय देवळीकर, प्रभारी मुख्याधिकारी, न. प. आर्वी
सीओंच्या उपस्थित चालला गजराज
- कदम यांनी अतिक्रमण करून बांधलेली सुरक्षा भिंत आर्वी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. याप्रसंगी आर्वी नगरपालिकेचे नगररचनाकार शंतनू भांडरकर, डॉ. कुमारसिंग कदम यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.