अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरण : आर्वीत मध्यरात्रीनंतर डॉक्टर पतीलाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:12 AM2022-01-16T11:12:25+5:302022-01-16T11:12:34+5:30
याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
राजेश सोलंकी
देउरवाडा (आर्वी): आर्वी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरणात सहावा आरोपी म्हणून मध्यरात्रीनंतर डॉक्टरला अटक केल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली. यामुळे परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. डॉक्टर नीरज कुमार कदम असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर रेखा कदम, दोन परिचारिका अल्पवयीन मुलाचे आई-वडील यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे
शनिवारीला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तपासणी चाललेली होती. वन्यप्राण्यांची कातडी पोलिसांना तपासणी दरम्यान सापडली तर टास्क फोर्सला शासकीय औषधी साठा आणि इंजेक्शन्स सापडले होते, तो जप्त करण्यात आला आहे. शासकीय औषधी साठा खाजगी हॉस्पिटलमध्ये कसा? याचा शोध पोलीस घेत आहेत. वन्य प्राण्यांची कातडी मिळाल्याच्या संदर्भात डॉक्टर नीरज कदम यांना वन विभागाने शनिवारी रात्री आठ ते नऊ वाजता नोटीस देऊन वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात रविवारीला उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे
वर्धा पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन तपासणी केली असता यासाठी तपासणीसाठी पथक नेमले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ठाणेदार भानुदास पिदुरकर, एपीआय वंदना सोनोने, फौजदार जोशना गिरी, फौजदार तावडे व डीबी पथकाचा समावेश आहे. या प्रकरणात आता आणखी खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. गर्भपात केंद्राची परवानगी डॉक्टर शैलेजा कदम (सासू) यांच्या नावाने आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने नागपूर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आली आहे