कडेकोट पोलीस बंदोबस्तात ‘कालिचरण’ महाराजांना आणले सेवाग्राम ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:00 AM2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:21+5:30
कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कालिचरण महाराजाला ताब्यात घेत वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात अभिजित ऊर्फ कालिचरण सराट महाराज यांच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२१ रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रायपूर येथील कारागृहातून महाराजांना ताब्यात घेत अटक करून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कालिचरण महाराजाला ताब्यात घेत वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात कालिचरण याला लवकरच हजर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी काळ्या फिती घालून कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात निषेध नोंदविला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते हे विशेष. न्यायालय परिसरात बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.
सुरक्षेच्या दृष्टीने केले सकाळीच हजर
- कालिचरण महाराजाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सकाळी ११ वाजताच्या न्यायालयात नेण्याचे ठरविले. त्यानुसार पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, महेंद्र इंगळेसह अधिकारी पहाटेपासूनच सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी हे देखील भ्रमणध्वनीवरून ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या संपर्कात होते.
पोलीस मेसमधून खाल्ली वरण-पोळी
- कालिचरण महाराजला सेवाग्राम ठाण्यात सकाळी नाश्त्यासाठी विचारण्यात आले असता त्याने नकार दिला. न्यायालातून त्याला पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्याला मुख्यालयातील मेसमधून जेवण देण्यात आले. जेवणात त्यानेकेवळ वरण आणि पोळी खाल्ल्याची माहिती आहे. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वर्धा पोलिसांनी पुन्हा त्याला रायपूर येथील कारागृहात सोडून देण्यासाठी घेऊ गेले.
पोलिसांनी घेतले व्हाईस सॅम्पल
- अभिजित ऊर्फ कालिचरण सराग याला सेवाग्राम पोलिसातील शेवटच्या खोलीत पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. तेथे पोलिसांनी त्याची विचारपूस केली. सोबतच पोलिसांनी ‘कालिचरण’चे व्हॉईस सॅम्पल घेत चौकशी केली. असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
न्यायालय परिसरात बंदोबस्त
- कालिचरण सराग याला न्यायालयात नेत असताना पोलिसांचा ताफा होता. न्यायालय परिसराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. पोलिसांनी न्यायालयाच्या पहिल्या प्रवेशद्वारामधून जाण्यास प्रवेश निषेध केला होता, हे विशेष. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनीही गर्दी केली होती.