कांबळे ...! आमच्या परिवारात फूट पाडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:27 PM2018-10-04T23:27:44+5:302018-10-04T23:32:27+5:30

आमच्या परिवारात काँग्रेसबद्दलची पक्षनिष्ठा पुर्वापार चालत आली आहे. प्रमोदबाबूनंतर त्यांचा राजकीय वारसदार हा शेखरच आहे. त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. पण, आमदार रणजीत कांबळे यांनी वारंवार शेखरचे राजकीय दमन करण्याचा प्रयत्न केला.

Kamble ...! Do not split in our family | कांबळे ...! आमच्या परिवारात फूट पाडू नका

कांबळे ...! आमच्या परिवारात फूट पाडू नका

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षा प्रमोद शेंडे यांचा पत्रकार परिषदेतून इशारा : मुलावरील पक्षांतर्गत दडपशाहीविरूद्ध उठविला आवाज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आमच्या परिवारात काँग्रेसबद्दलची पक्षनिष्ठा पुर्वापार चालत आली आहे. प्रमोदबाबूनंतर त्यांचा राजकीय वारसदार हा शेखरच आहे. त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. पण, आमदार रणजीत कांबळे यांनी वारंवार शेखरचे राजकीय दमन करण्याचा प्रयत्न केला. आता तर त्यांनी आमच्या परिवारातील भावा-भावांमध्येही फुट पाडण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांनी आपला मतदार संघ सांभाळावा, आमच्या परिवारात फुट पाडू नये, अन्यथा मलाही रिंंगणात उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेस नेते स्व.प्रमोद शेंडे यांच्या पत्नी वर्षा शेंडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव शेखर शेंडे यांच्या पक्षांतर्गत दडपशाहीविरुध्द त्याच्या मातोश्री वर्षा प्रमोद शेंडे यांनी गुरूवारी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून आवाज उठविला. यावेळी त्यांनी आमदार रणजित कांबळे यांच्यावर सडकून टिका केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्या दरम्यान आमदार कांबळे यांनी मोठा मुलगा रवी शेंडे याला व्हिआयपी पास उपलब्ध करुन देत चांगले संबंध असल्याचा दिखावा केला. तर शेखरला ही पास उपलब्ध करुन न देता त्याला दुर लोटून दोन भावांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी तीनही मुले सारखीच असून कांबळेचा हा नित्याचाच प्रकार आहे. त्यांनी आमच्या कुटूंबात कलह निर्माण करु नये. तसेच जिल्ह्यातही ढवळाढवळ न करता आपला देवळी-पुलगाव मतदार संघ सांभाळावा. आमदार अमर काळे आर्वी मतदार संघ सांभाळतील तर शेखर शेंडे हे वर्धा मतदार संघ सांभाळायला सक्षम आहे. प्रभाताईच्या वारस चारुलता टोकस या आमदार व मंत्रीही झाल्या असत्या पण, तिच्यावरही आमदार कांबळे बंदूक रोखत असल्याचा आरोपही वर्षा शेंडे यांनी केला. यावेळी प्रदेश सचिव शेखर यांनीही आमदार कांबळे यांच्या मनमर्जी कारभाराविरुध्द संताप व्यक्त केला.

याबाबत मी काही बोलू शकत नाही. पक्षामध्ये जर शेखर शेंडे यांना काही त्रास होत असेल किंवा माझ्याबाबत काही तक्रार असेल, तर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करावी. पास देण्याचा अधिकार मला नव्हता, ते प्रदेश कमिटीने ठरविले. माझ्यावर पक्ष वाढविण्याची जबाबदारी आहे, ते मी पार पाडत आहे.
रणजीत कांबळे, आमदार, देवळी पुलगाव.

शेखर शेंडे : आम्ही पक्षनिष्ठ आहे; पक्ष सोडणार नाही.
- तीन पिढ्यांपासून आम्ही काँग्रेसमध्ये आहोत. सतरा वर्षे माझे आजोबा भाऊसाहेब शेंडे विधान परिषदेचे सदस्य राहिलेत. माझे वडील प्रमोद शेंडे हे इंदिरा काँग्रेसचे गठन झाल्यानंतर १९७८ ते २००९ या कार्यकाळात सहा वेळा आमदार राहिलेत. शेवटची निवडणूक लढताना झालेल्या प्रचारसभेत विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत यापुढे निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांना पक्षानेही विनंती करूनही जनतेला शब्द दिल्याचे सांगत निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी आली, मी २००९ व २०१४ मध्ये निवडणूक लढलो.पण, एकदा युती असतानाही बंडखोरीमुळे तर दुसºयांदा मोदी लाटेमुळे पराभव स्विकारावा लागला.
- भाजपकडून उमेदवारीबाबत विचारणा झाली होती. पण, तीन पिढ्यांपासून काँग्रेसी असल्याने भाजपला दुरच ठेवले. वयाच्या २१ वर्षी मी नगराध्यक्ष झालो. तीन वेळा नगराध्यक्ष राहिलो. ज्यावेळी नगराध्यक्ष होतो, त्यावेळी माझ्याशिवाय आमदार कांबळेंना वर्धेत कुणी ओळखतही नव्हते.
-माझा भाऊ आकाश शेंडे नगराध्यक्ष झाल्यानंतर कांबळेंनी भाजपच्या काही सदस्यांना सोबत घेऊन त्यास पायउतार करण्यास हातभार लावला. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कसा कमकुवत होईल, यासाठी ते वारंवार प्रयत्न करतात.मीच एकटा या जिल्ह्यात काँग्रेसचा नेता राहिलो पाहिजे,या पद्धतीने त्यांची वागणूक असते.
-यापूर्वी सोनिया गांधी झेंडा मार्चच्या निमित्ताने २ आॅक्टोबर रोजी आल्या असता, त्यावेळी मला व माजी खासदार दत्ता मेघे यांनाही पास मिळू दिली नाही. आर्वीचे आमदार अमर काळे यांनाही डावलण्याचा प्रयत्न कांबळे यांच्याकडून होतो.
-माझ्या मतदारसंघात शहर काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड त्यांनी परस्पर केली. त्यात मला कुठेही विश्वासात घेतले नाही. त्याशिवाय मतदारसंघातील पदाधिकाºयाच्या नियुक्त्याही ते स्वत:च करतात. माझ्या मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांना नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणूकीमध्ये उमेदवारी देतात. विधानसभेमध्ये त्यांच्याकडून माझ्या पराभवासाठी प्रयत्नही करतात.
-मी नेहमीच कांबळे यांच्याशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न केला आहे. आजही करतो. परंतु त्यांनी नेहमीच अपमानाची वागणूक दिली. त्यांनी जर सन्मानाची वागणूक दिली तर आम्हीही त्याची सोबत करु. त्यांनी आम्हा लहान भावाप्रमाणे सांभाळावे.पण त्यांच्या हेकेखोर वागणूकीमुळे ते आमचे नेते होऊ शकत नाही. वाटल्यास चारुलता टोकस यांना आम्ही नेत्या मानायला तयार आहे.
-गांधी जयंतीदिनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घरी येऊन तासभर कार्यकर्त्यांना रॅली यशस्वी होण्यासाठी सूचना केल्यात. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी एक जण गांधीजींची वेशभूषा करून होता. त्याला सोबत घेऊन आम्ही पाच ते सहा हजार कार्यकर्ते गांधी चौकात गेलो असता कांबळे यांनी त्याला ढकलून अपमानास्पद वागणूक दिली.
-सध्या काँग्रेसचा कारभार त्यांच्याच बंगल्यावरुन चालत असून वरिष्ठ नेतेही दोन्ही गटांशी जुळवून घेत नसल्याने आ.कांबळे हे काँग्रेसला प्रायव्हेट लिमीटेड समजत आहे.पण, काहीही झाले तरी मी पक्ष सोडून जाणार नाही.कितीही वार केले तरी नुकसान पक्षाचेच होईल.आतापर्यत शांत बसलो पण,पुढे शांत बसणार नाही. अशी खदखद व्यक्त करुन शेखर शेंडे यांनी मन मोकळे केले.

Web Title: Kamble ...! Do not split in our family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.