अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:18 PM2018-02-01T23:18:32+5:302018-02-01T23:18:44+5:30

औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे.

Kamgar Bhawan in the name of Annabhau | अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन

अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : कामगारांचा मेळावा

ऑनलाईन लोकमत
देवळी : औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे. यामुळे औद्योगिक कामगारांना हक्काची जागा म्हणून शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कामगार भवन बांधून देण्याची ग्वाही देतो. या भवनाची देखरेख व व्यवस्था दिलीप उटाणे यांनी घ्यावी, असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.
आयटक जनरल इन्डस्ट्रिज कामगार युनियनच्यावतीने ३१ जानेवारी रोजी आयटक जिल्हा संघटक असलम पठाण यांच्या अध्यक्षतेत देवळी औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. उदघाटन खा. तडस यांच्या हस्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कामगारांच्या निवेदनावर खा. तडस म्हणाले की, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयटकने सुरू केलेला उपक्रम योग्य आहे. मी कामगारांच्या मागण्यांसोबत आहे, असे सांगितले.
शहरात प्रथमच लालझेंडा संघटनेने कामगारांची विशाल मोटर सायकल रॅली काढली.
आयटकचे राज्य सचिव उटाणे यांनी आयटक ही देशातील पहिली कामगार संघटना आहे. ३१ आॅक्टोबर १९२० रोजी मुंबईत लाला लजपत रॉय यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आली. कामगार चळवळीचा मोठा इतिहास संघटनेला आहे. देवळी औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या आहे. तेथील कामगारांच्या समस्या असून वेतन स्लीप मिळत नाही. इएसआयचे पैसे कापले जातात; पण कार्ड दिले जात नाही. पिएफचे पैसे वेतनातून कपात होतात; पण खात्यात वेळेवर भरले जात नाही. अनेक वर्षे होऊनही बोनस दिला जात नाही. सुरक्षेसाठी हेल्मेट, शुज गॉगल आदी साहित्य दिले जात नाही. कामगार कायद्याप्रमाणे सुविधा नाही, असे सांगितले. संविधानातील कामगार कायद्यात होणारे बदल, सरकारचे कामगार विरोधी धोरण आदी विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी मनोहर पचारे, वामन भेंडे, गौतम पोपटकर, किरण ठाकरे यांनी कामगारांच्या मागण्यांना पाठींबा दिला. मेळाव्यात महालक्ष्मी, गॅमन, व्हिल्स इंडिया, गृप्ता पॉवर आदी कंपन्यांतील कामगार सहभागी झाले होते. संचालन नाल्हे यांनी केले.

एमआयडीसीतील कामगारांना आधार
औद्योगिक विकास महामंडळातील कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांच्या समस्या सोडविण्याकरिता अनेक संघटना पूढे आल्या; पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. आता आयटकने पुढाकार घेत कामगारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. यात लोकप्रतिनिधींनीही मार्गदर्शन केल्याने तथा मदतीची ग्वाही दिल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. आयटकच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षाही मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Kamgar Bhawan in the name of Annabhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.