कराड पोलिसांची चमू जामणी साखर कारखान्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:28 AM2018-11-21T00:28:04+5:302018-11-21T00:28:22+5:30
मानस शुगर अँड पावर कंपनी सोबत करार केला; पण मजूर दुसऱ्या कारखान्याला पुरवले. यामुळे सदर कंत्राटदाराच्या मुलाला कारखाना प्रशासनाने उचलून आणले, अशी तक्रार पुसद जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांकडे प्राप्त होताच सेलू पोलिसाच्या मदतीने खंडाळा पोलीसांनी जामनी येथील साखर कारखाना गाठून पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : मानस शुगर अँड पावर कंपनी सोबत करार केला; पण मजूर दुसऱ्या कारखान्याला पुरवले. यामुळे सदर कंत्राटदाराच्या मुलाला कारखाना प्रशासनाने उचलून आणले, अशी तक्रार पुसद जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांकडे प्राप्त होताच सेलू पोलिसाच्या मदतीने खंडाळा पोलीसांनी जामनी येथील साखर कारखाना गाठून पाहणी केली. परंतु, त्यांना आरोपी गवसला नाही, हे विशेष.
पोलीस स्टेशन फेतरा खंडाळा येथील ऊसतोड कंत्राटदार बाळू कपाटे यांनी मानस शुगर अँड पावर कंपनीशी ऊसतोडणीचा करार केला होता. आता साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होत असून कारखाना साईटवर मजुरांच्या टोळ्या येणे सुरु आहे; पण बाळू कापटे याची टोळी कारखाना साईटवर न आल्याने गावात जावून कारखान्याच्या अधिकाºयांनी चौकशी केली. त्यावेळी बाळूची टोळी इतरत्र गेल्याची माहिती मिळाली. त्याआधारे खंडाळा पोलीस स्टेशनचे जमादार सुरेश ढाले, पोलीस नायक गजानन जाधव यांनी सेलू पोलीस ठाण्यातील जमादार ज्ञानेश्वर खैरकार, पोलीस नायक कोहचाडे यांच्या मदतीने कारखान्यावर मुकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शोध लागला नाही.
दोन इसमांना मानस साखर कारखान्यात डांबून ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. आमच्या ठाणेदारांच्या आदेशानुसार तसेच सेलू पोलिसांच्या मदतीने येथे शोध घेण्यात आला; पण ते आढळून आले नाही.
- सुरेश ढाले, जमादार पोलीस स्टेशन खंडाळा.