कारंजाला दुसऱ्याही दिवशी गारपिटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:28 PM2018-02-14T22:28:16+5:302018-02-14T22:28:27+5:30
कारंजा तालुक्यातील काही गावांना, सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतर उजाडलेल्या मंगळवारीही अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे बºयापैकी नुकसान झाले आहे.
ऑनलाईन लोकमत
कारंजा (घा.) : कारंजा तालुक्यातील काही गावांना, सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतर उजाडलेल्या मंगळवारीही अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
मंगळवारी रात्री ८.४५ ते ९.१५ या कालावधीत जणू पावसाळ्यासारखा मुसळधार पाऊस या भागात झाला. यावेळी पावसासह वादळी वाराही सुरू होता. परिसरातील ठाणेगाव, बोटोणा (पारडी), चंदेवाणी, मदनी, बिहाडी, मोर्शी खरसखांडा, हेटीकुंडी, आगरगाव भागात गारपीट झाले. वादळी वाऱ्यासह गारपिटामुळे शेतातील उभा गहू, चणा, तूर, संत्रा, मोसंबी, फुलझाडे व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय सावली, चंदेवाणी व काही गावात घरांची तसेच गोठ्यांची पडझडही झाल्याचे सांगण्यात येते. गारांचा मार लागल्याने काही इसम जखमी तर पाळीव प्राणीही जखमी झाल्याचे वास्तव आहे. जखमी इसमांवर स्थानिक ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. चंदेवाणी बिहाडी परिसराला पुन्हा गारपिटीचा फटका सहन करावा लागल्याने तेथील नुकसानग्रस्त हवालदिल झाले आहेत. दाभा, सावळी, कारंजा, हेटीकुंडी, बोरीसह एकूण १९ गावातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आ. अमर काळे व खा. आनंद अडसूळ यांच्याकडे संतप्त नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.