संघटनात्मक वादामुळे आंतरशालेय स्पर्धेतून कराटे खेळ बाद
By अभिनय खोपडे | Published: August 30, 2023 05:15 PM2023-08-30T17:15:27+5:302023-08-30T17:15:54+5:30
स्थगिती मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन : वर्ध्यातील कराटे प्रशिक्षकांचा इशारा
वर्धा : राज्यात कराटे संघटनामध्ये वाद निर्माण झाल्याने तसेच एकाच खेळाच्या विविध संघटना असल्याचा कारणावरून आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २०२३ -२४ मध्ये कराटे, तायकॉडो, किक बॉक्सिंग या खेळावर आंतरशालेय स्पर्धेत स्थगिती दिली आहे. त्यामुळे कराटे खेळ या स्पर्धेतून बाद झाला आहे. आयुक्तांनी दिलेली स्थगिती उठविण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा वर्ध्यांतील कराटे प्रशिक्षकांनी राज्य शासनाला दिला आहे.
एकाच खेळाच्या विविध संघटना निर्माण झाल्या असून त्यांच्यातील वाद वाढल्याने आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. संघटनेच्या वादामुळे शालेय शासनाच्या स्पर्धा न थांबवता आपल्या नियमानुसार संबंधित खेळाचे क्रीडाशिक्षक व राज्य राष्ट्रीय खेळाडूंचे तांत्रिक सहकार्य घेऊन स्पर्धा पूर्ण कराव्यात. किंवा काही पर्यायी व्यवस्था करावी कारण या खेळाच्या स्थगितीमुळे वर्षानुवर्ष नियमित सराव करणारे खेळाडू निराश व हताश होत असून पर्यायी अनेक खेळाडू क्रमाक्रमाने क्लासेस सोडून जात आहे. त्यामुळे अनेक मार्शल आर्ट प्रशिक्षकांवर भविष्यात उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खेळाडूंवर होणारा अन्याय थांबवत कराटे, तायकॉडो, किक बॉक्सिंग या खेळावरची स्थगिती त्वरित मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर मित्र कराटे प्रशिक्षकांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्हा कराटे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उल्हास वाघ, अध्यक्ष शेख दत्तू कुरेशी, सचिव मंगेश भोंगाडे, कोषाध्यक्ष दिलीप कठाणे, प्रशिक्षक निलेश राऊत, रामा तायडे, कल्याणी भोंगाडे, समीर साहू आदींनी दिला आहे. आंतरशालेय स्पर्धा या संघटनेच्या स्पर्धा नसून त्या शासनाच्या स्पर्धा आहे. या स्पर्धांवर संघटनेने कोणताही अधिकार व हक्क गाजवू नये. तसेच एका खेळाच्या दोन संघटना व व्यक्तीमध्ये मतभेद असल्यास शासन नियमानुसार आम्ही त्या खेळाशी संबंधित क्रीडा शिक्षक व राज्य राष्ट्रीय खेळाडूंच्या तांत्रिक सहकार्यानी स्पर्धा पूर्ण करू अशी सर्व खेळाच्या जिल्हा संघटनेला क्रीडा अधिकारी ताकीद दिली जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.