बारामतीकराने नेली लाखात काचनूरची गाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:53 PM2017-12-01T23:53:00+5:302017-12-01T23:53:12+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि कारंजा पंचायत समितीतर्फे गुरुवारी कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कर्मचारी दादासाहेब कन्नमवार विद्यालयाच्या प्रांगणात गवळाऊ गायींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि कारंजा पंचायत समितीतर्फे गुरुवारी कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कर्मचारी दादासाहेब कन्नमवार विद्यालयाच्या प्रांगणात गवळाऊ गायींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे फलीत म्हणून सर्वोत्कृष्ट ठरलेली काचनूर येथील देविदास राऊत यांची कालवड बारामती येथील शेतकरी जगताप यांनी १ लाख रुपयांत खरेदी केली. विशेष म्हणजे ही कालवड विभागाच्या कृत्रिम रेतन कार्यामुळे निर्माण झाली होती.
या प्रदर्शनीचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दादाराव केचे, समाजकल्याण समितीच्या सभापती निता गजाम, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुमरे, जि.प. सदस्य सरीता गाखरे, रेवता धोटे, कारंजाच्या पं.स. सदस्य आम्रपाली बागडे, जगदीश डोळे तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. गजानन डांगे यांची उपस्थिती होती.
प्रदर्शनात २९७ जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्याकरिता डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. नितीन फुके, डॉ. अजय पोहरकर, डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे यांची चार सदस्यीय तज्ञनिवड समितीची स्थापना केली होती. या निवड समितीने प्रत्येक जनावरांचे सखोल परिक्षण करून उत्कृष्ट नऊ जनावरांची निवड केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, यांनी केले. संचालन तांत्रिक अधिकारी डॉ. बी.व्ही. वंजारी यांनी केले. मान्यवरांचे आभार पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.एस. जोगेकर यांनी मानले. यावेळी पशुपालकांची उपस्थिती होती.
पुरस्कार विजेते पशुपालक
वळू गटाचे प्रथम बक्षीस बोरगाव ता. कारंजा येथील सतिश प्रभाकर धारपुरे ठरले. तर द्वितीय पुरस्कार दहेगाव (गोंडी) ता. आर्वी येथील रूपराव गणेश अरगडे, आणि तृतीय पुरस्कार सावंगी पोड ता. आर्वी येथील लोबेश्वर भाऊराव कोरडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल.
गवळाऊ कालवड गटामध्ये प्रथम खरांगणा मो. ता. आर्वी येथील भोजराज माणिक अरबट ठरले. तर द्वितीय पुरस्कार विरूळ येथील दिनेश विठोबा माधुरे आणि तृतीय माळेगाव काळी ता. कारंजा येथील संदीप अंबादास गहाट यांना प्रदान करण्यात आला. गवळाऊ गाय गटामध्ये प्रथम काचनूर येथील देविदास राऊत ठरले तर द्वितीय कारंजा येथील राजू जंगलू लाड आणि तृतीय माळेगाव येथील विनोद पंडितराव येवले यांना प्रदान करण्यात आला.