कस्तुरबा आधुनिक काळातही स्त्रियांसाठी प्रेरणादायी; आज १५४ वी जयंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:37 AM2023-04-11T11:37:31+5:302023-04-11T11:39:42+5:30
कस्तुरबा गांधी या पारंपरिक जीवन पद्धती व रूढींना मानणाऱ्या होत्या
सेवाग्राम (वर्धा) : स्वातंत्र्य चळवळीतील स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या बळावर विविध पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्मयोगिनी म्हणजे कस्तुरबा गांधी होय. आधुनिक काळातही त्या प्रेरणेचा अखंड झरा असून, आदर्श भारतीय महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची दि. ११ एप्रिल रोजी १५४ वी जयंती असून, त्यांचे स्मरण समस्त महिलांना प्रेरणा आणि कार्याला चालना देणारे असेच आहे.
कस्तुरबा गांधी या पारंपरिक जीवन पद्धती व रूढींना मानणाऱ्या होत्या. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाल्याने आधुनिक भारतातील नव्या पिढीला नवल वाटावा असाच विषय. एवढ्या लहान वयात विवाह होऊनही गांधीजींनी आपले शिक्षण आणि आपल्या पत्नीला साक्षर करण्यास जराही कसूर केली नाही. बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी गांधीजी विलायतेत गेले, तेव्हा आपल्या निष्ठा आणि तत्वांवर कायम राहिले. गांधीजींनी आपल्या जीवनात जे प्राप्त केले ते आपल्या सहधर्मचारिणीमुळेच. ‘ती माझी प्रेरणा आणि बलस्थान आहे,’ अशी कबुली खुद्द गांधीजी देतात. ‘सामान्य कुटुंबाप्रमाणे त्यांचेही कुटुंब असल्याने घरात तंटे व्हायचे पण परिणाम मात्र सदैव चांगलेच राहिले,’ असेही गांधीजी म्हणतात.
कस्तुरबामध्ये खास गोष्ट म्हणजे बापूंच्या प्रत्येक विचार, कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग राहिला. श्रीमंत कुटुंबातील असूनही फकिरीचे आणि सार्वजनिक आश्रमीय जीवनपद्धतीचा अंगिकार त्यांनी केला होता. बापूंचे कार्य हे राष्ट्र आणि आपल्यासाठीच असल्याने आपण ते स्वीकारले पाहिजे, अशीच त्यागाची भावना शेवटपर्यंत राहिली होती.
बापूंवर अनेकदा हल्लेसुद्धा झाले. उपोषणसुद्धा करण्यात आले. अशा प्रसंगी बा त्यांच्यासोबत असायच्या. १९३२ मध्ये हरिजनांच्या प्रश्नावरून बापूंनी येरवडा तुरुंगात उपवास केला. त्यावेळी बा साबरमती तुरुंगात होत्या. त्यांच्या मनाची अस्वस्थता खूप काही दाखवून गेली. ‘बा मध्ये दृढ इच्छाशक्ती होती. त्यामुळे ती माझी गुरू आहे,’ असे बापूंचे म्हणणं होतं. डरबनमध्ये असताना बा आजारी पडल्या. त्यांना शक्तीसाठी मांस किंवा बीफ टी देण्याचा सल्ला वैद्यकाने दिला. गांधीजींनी बा स्वतंत्र आहे. त्यांची इच्छा असेल तर त्या घेऊ शकतात, असे सांगितले. पण बा ने मात्र ते घेण्यास नकार दिला. यावरून गांधीजींनी त्यांच्या विचारांचा सन्मान करून त्या स्वतंत्र असल्याचे स्पष्ट केले. बापूंनी दूध न पिण्याची प्रतिज्ञा घेतली होती. पण तब्बेत बिघडल्याने डाॅक्टरांनी दूध घेण्याचा सल्ला दिला तरी यात प्रतिज्ञा आड आली. यावेळी बा नी बकरीचे दूध घेण्याचा सल्ला दिला आणि बापूंनी तो मान्य केला.
दक्षिण आफ्रिका ते सेवाग्राम आश्रम असा बां चा जीवनप्रवास संघर्षमय राहिला असला तरी आपली दिनचर्या त्यांनी अखंड ठेवली. सेवाग्राम आश्रमातील दैनंदिन कार्यक्रमात त्या भाग घेत. याची सुरूवात पहाटे चार वाजल्यापासून होत असे. प्रार्थना, श्रमदान, रसोडा, सूतकताई, वाचन, गीता पाठ, संस्कृत, सायंकाळी फिरायला जाणे, आश्रमात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या भेटीगाठी, निवास व्यवस्था आदी कामांत त्या सदैव अग्रेसर असायच्या. पारंपरिक पद्धतीच्या सण, उत्सवात त्या आवर्जून उपस्थित राहत असत.
आश्रमात स्वतंत्र अशी व्यवस्था नसल्याने एक कुटुंब अशीच पद्धती अस्तित्वात होती. बां ना जाऊन ७९ वर्षे झाली असून, गांधी आश्रमातील बा कुटी सदैव त्यांचे स्मरण करून देते. एक सामान्य महिला आपल्या अफाट कर्तृत्वाने देशापुढेच नाही तर जगात आदराचे स्थान निर्माण करू शकल्या. आजही त्यांच्या स्मृती आश्रमात सांभाळून ठेवल्याने यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम होत आहे.