काटाेलच्या प्राध्यापकाची वर्धा नदीत आत्महत्या; २० तासानंतर १३ किमी अंतरावर सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 03:49 PM2022-07-16T15:49:56+5:302022-07-16T15:51:41+5:30
अवघ्या काही दिवसांवर त्यांचा विवाह असून, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने या मागाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
तळेगाव (श्याम.पंत) (वर्धा) : नागपूर-अमरावती महामार्गालगत कार उभी करून काटाेलच्या नबीरा महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने वर्धा नदीपात्रात उडी घेतली होती. तब्बल वीस तासांनंतर घटनास्थळापासून १३ किलोमीटर अंतरावर निंबोली (शेंडे) येथे शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. अवघ्या काही दिवसांवर त्यांचा विवाह असून, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने या मागाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
प्रा. डॉ. विनोद बागवाले (५२, रा. यवतमाळ, ह.मु. काटाेल, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते काटोल येथील नबीरा महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते एमएच-४०/एआर-३०५२ क्रमांकाच्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खडका या गावाजवळ आले. त्यांनी महामार्गाच्या बाजूला कार उभी करून लगतच्या वर्धा नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत याची माहिती तळेगाव (श्याम.पंत) पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच विविध पथके तयार करून त्यांचा नदीपात्रात शोध घेतला. अखेर शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळापासून १३ किलोमीटर अंतरावरील निंबोली (शेंडे) येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.
कारण गुलदस्त्यात
डॉ. विनोद बागवाले यांचा अमरावती येथील मुलीशी विवाह ठरला होता. काही दिवसांवर हा विवाह सोहळा संपन्न होणार होता. परंतु त्यापूर्वीच आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असून आत्महत्येचे खरे कारण गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये करीत आहे.