बापूंचा अमूल्य ठेवा सर्वांसाठीच प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:53 PM2018-10-01T22:53:32+5:302018-10-01T22:54:15+5:30
येथील गांधी सेवा संघामध्ये बापूंचे अमूल्य असे दस्तावेज संग्रहीत असून अध्ययनासाठी येणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. महादेवभाई भवन परिसरात आणि याच इमारतीला लागून गांधी सेवा संघाची वास्तू आहे. स्थापन झालेली एकमेव संस्था म्हणून गांधी सेवा संघ होय. याची स्थापना १३ जुलै १९२३ रोजी झाली.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील गांधी सेवा संघामध्ये बापूंचे अमूल्य असे दस्तावेज संग्रहीत असून अध्ययनासाठी येणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. महादेवभाई भवन परिसरात आणि याच इमारतीला लागून गांधी सेवा संघाची वास्तू आहे. स्थापन झालेली एकमेव संस्था म्हणून गांधी सेवा संघ होय. याची स्थापना १३ जुलै १९२३ रोजी झाली.
गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय रचनात्मक संस्थांच्या नोंदी दस्तावेज, प्रकाशन, पुस्तक व पत्रिकांचे संकलन आदी कार्य करणे तसेच त्यांचे सरंक्षण, चांगल्या प्रकारची व्यवस्था करून आदर्श ग्रथालयाची निर्मिती गांधी सेवा संघाने करून कार्य आणि ठेवा पुढच्या पिढीसाठी अद्ययावत करून ठेवण्याचे कार्य केले आहे आणि ते सुरूही आहे. गांधीजींचे पत्र, प्रमाणपत्र, बंदर, तराजू, पदक, तसेच सुधारीत चरखा आदी ग्रंथालयात पहावयास मिळते. याच संग्रहीत अमूल्या ठेव्यासोबत सूतांच्या गुंड्यांपण आहेत. यामध्ये १०० नंबरपासून तर ४०० नंबरच्या सूताचा समावेश आहे. भारतात आगपेटीच्या डब्बीत पैठणी मावत होती असे सांगितल्या गेलेले आहे. यावर विश्वास बसत नाही; पण गांधी सेवा संघामध्ये इतक्या बारीक सूताची गुंडी पाहायला मिळते. यावरून नक्कीच पैठणीच्या सांगितल्या जाणाºया विषयावर नक्कीच विश्वास बसू शकतो. गांधी सेवा संघाचे ग्रंथालय अध्ययनासाठी जितके महत्वाचे आहे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त बापूंचा अमूल्य ठेवा आहे.
नियमित होते सूतकताई
गांधी सेवा संघामध्ये नियमित सूत कताई केली जाते. यात किसान चरखा व पेटी चरखा याचा वापर केल्या जातो. तेथील कर्मचारी स्वत: पेळू तयार करतात. शिवाय कताईसाठी त्याचा उपयोग करतात. याच सूतापासून ते स्वत:साठी कापड तयार करून आणतात. तसेच त्यांनी तयार केलेला कापड गांधीवादी वापरतात.
महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे काही साहित्य व पत्रांचे येथे जतन केले जात आहे. संस्था गांधी साहित्यासोबत या अमूल्य वस्तूंचे महत्व जाणून आहे. ते सुरक्षित व सरंक्षित करून जतन करून ठेवण्यात आलेले आहे.
- कनकमल गांधी, अध्यक्ष, गांधी सेवा संघ. सेवाग्राम.
वाचनालयात पुस्तक प्रेमी व अध्ययनासाठी विद्यार्थी येतात. येथील साहित्य व अमूल्य ठेवा प्रेरणा देण्याचे काम करीत आहे.
- प्रकाश क्षीरसागर, ग्रंथपाल, सेवाग्राम.