कॉटन मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:54 PM2018-07-16T22:54:03+5:302018-07-16T22:54:46+5:30
गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्र्व जिनिंग व प्रेसिंग मिलचे मालक, व्यवस्थापक यांची बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, पडलेल्या सरकीपासून झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून कोणत्याही ठिकाणी सरकीपासून झाड उगवू देऊ नका. पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मिटर अंतरावर एक कामगंध सापळा याप्रमाणे सगळीकडे कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये सापडणाºया पतंगाची गणना करून तालुका कृषी अधिकाºयांना कळवावे. ठिकठिकाणी प्रकाश सापळे संध्याकाळी ६ ते ११ च्या कालावधीत लावून जास्तीत जास्त पतंग किटक जमा होतील, अशी व्यवस्था करावी. या सर्व बाबींवर कार्यवाही न करणाºया मिलधारकांवर फौजदारी कलम १३३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पर्यावरणास धोका निर्माण करणे याबाबींतर्गत पर्यावरण कायद्याच्या आधारे परवाना रद्द करण्याबाबत संबंधीत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. सर्व मिलधारकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांच्या २ कि.मी परिसरातील शेतकºयांना किंवा एक हजार शेतकºयांना मोफत कामगंध सापळे व दोन ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी त्यांच्या परिसरातील दोन हजार शेतकºयांना कामगंध सापळे व ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.
हिंगणघाटात सर्वाधिक खरेदी
बोंडअळीच्या प्रकोपानंतरही हिंगणघाट बाजार समितींतर्गत सर्वाधिक कापसाची खरेदी जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे हिंगणघाट, आर्वी, देवळी, वर्धा, सेलू येथील जिनिंग प्रेसिंग कंपनीसह जिल्ह्याच्या विविध भागातील मिल मालकांना जिल्हाधिकाºयांनी बैठकीतून प्रकोप वाढू नये यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यावसायिकांनीही बाजू मांडली.