व्याघ्रभ्रमंती मार्ग टिकवा; अन्यथा कारवाई करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:02+5:30
या गावांचे पुनर्वसन करून प्रश्न सुटणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मनुष्य आणि वन्यजीव हानी टाळण्यासाठी गावांना आणि शेताला सौर कुंपण देणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोर प्रकल्प येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट आणि वापरात नसलेल्या इमारती एफडीसीएमकडे हस्तांतरित केल्यास त्याची योग्य काळजी घेऊन त्यांचा चांगला वापर करता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाघाचा अधिवास असणारे जंगल सर्वात समृद्ध आणि परिपूर्ण जंगल समजले जाते. वाघांसाठी गाभा क्षेत्रासोबतच त्यांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. परंतु, विकासात्मक कामे करताना जंगलातील वाघाचे भ्रमंती मार्ग बाधित होतात. वाघांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवण्यास बाधा आणणारे विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.
बोर अभयारण्यातील पुनर्वसित नवरगावची पाहणी करून बोर व्याघ्रप्रकल्पात भ्रमंती करून वनविभागाच्या जुन्या नवरगाव येथील विश्रामगृहात अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी राठोड बोलत होते. वनविभाग, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण अशा तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी कामाचे नियोजन, नावीन्यपूर्ण प्रकल्प आणि येणाऱ्या अडचणीसंदर्भात चर्चा केली. मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हा संघर्ष कशा पद्धतीने कमी करता येईल याबाबत त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. बोर व्याघ्रप्रकल्पातील गाभाक्षेत्रात येणारे नवरगाव हे एकमेव गाव असून त्याचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. मात्र गाभाक्षेत्राला लागून असलेल्या २२ गावांची पुनर्वसनाची मागणी आहे.
या गावांचे पुनर्वसन करून प्रश्न सुटणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मनुष्य आणि वन्यजीव हानी टाळण्यासाठी गावांना आणि शेताला सौर कुंपण देणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोर प्रकल्प येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट आणि वापरात नसलेल्या इमारती एफडीसीएमकडे हस्तांतरित केल्यास त्याची योग्य काळजी घेऊन त्यांचा चांगला वापर करता येईल. यासंदर्भात त्यांनी स्वतः पर्यटन मंत्र्यांसोबत चर्चा करून हा मुद्दा मार्गी लावू, असे सांगितले.
प्रत्येक वनक्षेत्रामध्ये जखमी होणाऱ्या वन्यजीवांसाठी ट्रान्झिट उपचार केंद्र असणे आवश्यक आहे. यामुळे प्राण्यांना तत्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविता येऊ शकतात. असे केंद्र सुरू करण्यासाठीसुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊ, असेही राठोड यांनी सांगितले.
बोर व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात येणारे नवरगावचे पुनर्वसन आदर्श पुनर्वसन झाले असून, वनविभागाच्या या पुनर्वसनाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. पुनर्वसनाबाबत गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. यावेळी मुख्य वन संरक्षक तथा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूरचे पी कल्याणकुमार, नागपूरचे सामाजिक वनीकरण वनसंरक्षक मानकर, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक जोशी, नागपूर वन्यजीव बोर अभयारण्यचे विभागीय वनाधिकारी आर. बी. गवई तसेच वन विभागाचे इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.