जागा मिळेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा
By admin | Published: September 29, 2016 12:48 AM2016-09-29T00:48:27+5:302016-09-29T00:48:27+5:30
बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : हॉकर्स किरकोळ फुटपाथ विक्रेत्यांचे साकडे
वर्धा : बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला. पर्यायी जागाही मिळाली नसल्याने व्यवसाय बंद आहे. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. बुधवारी बजाज चौकातून मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील मुख्य बाजार लाईन, गोल बाजार, अंबिका चौक, बसस्थानक, बजाज चौक, आर्वी नाका, इंगोले, चौक, शिवाजी पुतळा चौक, पत्रावळी चौक येथील फुटपाथवर फळ, भाजी, होजीयरी, चहा, पानठेले, अल्पोपहार, हार-फुल विक्रेते आदींचे व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांना पालिकेने रस्त्याच्या कडेला बंड्या वा दुकाने लावण्यास मनाई केली आहे. परिणामी, या किरकोळ व्यापाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. बाजार लाईन परिसरातच जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बुधवारी बजाज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. हा मोर्चा न्यायालयाजवळ अडविण्यात आला. यानंतर भास्कर इथापे, विजय आगलावे, रवींद्र शाहु, प्रमोद भोमले, मंगेश शेंडे, हबीब यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन सादर केले. चर्चेत जिल्हाधिकारी व न.प. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेनंतर तोडगा काढला जाईल, असे सांगितले.
मोर्चामध्ये विनोद वानखेडे, अहमद खा पठाण, प्रवीण कांबळे, इद्रीस खा पठाण, नुर खा पठाण, कांचन खेकडे, रूस्तम, अंतकला नगराळे, अय्याज, सलमान, राजू वैद्य, अनिल जवादे, निजाम, छमू, इमरान, रिजवान कुरेशी, जगदीश शिरभाते, पंढरी खेकडे, मंदा गेडाम मुन्ना बेग, विजू वैद्य, हमिदाबाई, मनोहर निमजे, गुलाब, संदीप सावरकर, कमलेश छकोले, अरविंद वैद्य, अकिल, अर्षद यासह फुटपाथ विक्रेते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
बाजारातील रस्ते झाले मोकळे
शहराच्या बाजारओळीतील अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले आहेत. कित्येक दिवसांपासून निमूळते झालेले रस्ते मोकळे दिसत आहेत. बाजारातील प्रत्येक दुकानासमोर हातगाड्या, लहान दुकाने लागत असल्याने ती रस्त्यावर येतात. परिणामी, ग्राहक तसेच दुकानदारांना वाहने ठेवण्यासाठीही जागा राहत नाही. यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण विक्रेत्यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे.
उदरनिर्वाहाचा प्रश्न झाला गंभीर
शहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य वस्तू विक्रेत्यांचे रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला, बाजारओळीत दुकानांसमोर बसून व्यवसाय करणारे हे नागरिक दररोजच्या मिळकतीवर कुटुंबाचे पालनपोषण करतात. पर्यायी जागा देण्याबाबतचे सर्वेक्षण पालिका प्रशासनाने केले. असे असले तरी या प्रक्रियेला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. इतके दिवस दुकान बंद ठेवून हे विक्रेते कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाही. यामुळे किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.