केसरी कार्डधारक धान्यापासून वंचित
By admin | Published: March 13, 2017 12:46 AM2017-03-13T00:46:08+5:302017-03-13T00:46:08+5:30
ग्रामीण भागातील शेतकरी व केसरी कार्ड धारकांना अत्यल्प दरात स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जात होते;
ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त : खुल्या बाजारातून महागडे धान्य घेण्याची वेळ
देवळी/कोळोणा (चोरे) : ग्रामीण भागातील शेतकरी व केसरी कार्ड धारकांना अत्यल्प दरात स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जात होते; पण शासनाने अचानक एक अध्यादेश काढून हे धान्य बंद केले. परिणामी, ग्रामीण भागातील केसरी कार्ड धारकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचीही गळचेपी झाली आहे.
केसरी कार्डधारक कुटुंब तथा शेतकऱ्यांना अल्प किमतीत गहू आणि तांदूळ मिळत होते. एपीएल कार्ड धारकांना पूर्वीपासून तर शेतकऱ्यांना स्वस्त धान्य पुरविण्याची योजना एक वर्षापासून राबविली जात होती. परिणामी, कुणीही धान्याचा साठा करून ठेवला नाही. त्यांना प्रत्येक महिन्यात अल्प दरात धान्य मिळत असल्याने धान्याची साठवणूक करण्याची कुणाला गरज वाटली नाही; पण अचानक शासनाने हा धान्य पुरवठा बंद केला. यामुळे कार्डधारकांची गोची झाली आहे. स्वस्त धान्य दुकानात या महिन्याचा धान्याचा साठा आला असता संबंधित कार्डधारक मालाची उचल करण्यासाठी दुकानात गेले. याप्रसंगी स्वस्त धान्य दुकानदाराने तुमचे धान्य बंद करण्यात आले आहे, असे सांगितले.
या प्रकारामुळे कार्डधारक चक्रावले. आमचे धान्य अचानक कसे बंद झाले यावरून दुकानदाराशी काही ग्राहकांचे वादही झाले; पण दुकानदाराचा नाईलाज होता. महिन्याला जितक्या रकमेत दहा किलो धान्य मिळत होते, तितक्या रकमेत दोन तीन किलोही धान्य बाजारात मिळू शकत नाही. पैसे असताना ग्रामीण भागात धान्य मिळत नाही, अशी स्थिती ग्रामीण केसरी कार्डधारक तथा शेतकऱ्यांची झाली आहे.
याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून बंद करण्यात आलेली योजना पुर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक बोजातून बाहेर काढावे, अशी मागणी नरेश ओंकार, रवींद्र उपासे, नाना थोटे, प्रशांत मुनेश्वर, भाग्यवान भस्मे, नंदू भस्मे, सम्यक ओंकार, रमेश गोबाडे, उमेश चावरे, संदीप चावरे, देवानंद वागदे आदींनी निवेदनातून केली आहे.(प्रतिनिधी/वार्ताहर)