अंकूर वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:42 PM2018-06-16T23:42:30+5:302018-06-16T23:42:37+5:30
रोहिनी नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सतत दोन-तीन दिवस पाऊस आणि मृग नक्षत्रास प्रारंभ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली; पण आता तीच घाई पिकांवर बेतण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रोहिनी नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सतत दोन-तीन दिवस पाऊस आणि मृग नक्षत्रास प्रारंभ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली; पण आता तीच घाई पिकांवर बेतण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीवर डोकावणारे अंकूर कोमेजण्याच्या स्थितीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अंकूर वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड करावी लागत आहे. कुठे फवाºयाने तर कुठे गुंडांनी रोपटे, बियाण्यांना पाणी दिले जात आहे.
जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकºयांनी पहिल्या पावसात पेरण्या आटोपत्या घेतल्या. पावसाचे सातत्य कायम राहील, अशी आशा करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे पेरलेले बियाणे उगवले. अंकूर जमिनीवर आले; पण ४० अंशांवर पोहोचलेल्या पाऱ्यामुळे हे अंकूर तग धरू शकणार नसल्याची बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. यामुळे सिंचनाची सोय असलेले शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने बियाणे, रोपट्यांना पाणी देत आहेत; पण कोरडवाहु शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी दिसून येत आहे. समुद्रपूर तालुक्यात काही शेतकरी मजुरांमार्फत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसह गुंडांनी बियाणे, रोपट्यांना पाणी देताना दिसून येत आहे. सेलू तालुक्यातही अशीच विदारक स्थिती असून फवारणी यंत्राद्वारे पाणी देत शेतकरी रोपट्यांना वाचविण्याची धडपड करताना दिसून येत आहे.
दोन-तीन दिवसांच्या पावसानंतर सर्वत्र कडक उन्ह तापत असल्याने बियाणे जमिनीतच नष्ट होण्याची तथा अंकूर कोमेजण्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकरी चिंतातूर आहेत. २२ जूनपर्यंत पाऊस येणार नाही, असे भाकित असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट दिसून येत आहे.
दुबारचे सावट
जिल्ह्यात ८ ते १० जूनपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र बरसल्याने शेतकºयांनी पेरण्यांची घाई केली. हवामान खात्याने २२ जूनपर्यंत पाऊस नसल्याची तर कृषी विभागाने पेरण्या न करण्याचा सल्ला दिला होता; पण शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरण्या केल्या. पेरलेले बियाणे अंकूरले; पण पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागेल.