पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड

By admin | Published: July 15, 2015 02:43 AM2015-07-15T02:43:36+5:302015-07-15T02:43:36+5:30

पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभी काही दिवस चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी आटोपती घेतली; पण गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

Kevilini tragedy to save the crop | पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड

पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड

Next

दुबार पेरणीचे संकट : कोरडवाहूतील पिकांना शेतकरी देताहेत पिंप, गुंडांनी पाणी; स्प्रिंकलरच्या मागणीत वाढ
वर्धा : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभी काही दिवस चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी आटोपती घेतली; पण गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी स्प्रिंकलर व ड्रीपच्या साह्याने पिकांना जगवत आहे; पण कोरडवाहु शेती असलेल्या शेतकऱ्यांना पिकांना वाचविण्याकरिता मजुरांकडून गुंड, पिंप व अन्य भांड्यांनी पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. पाऊस न आल्यास जिल्ह्यातील अर्ध्याधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून थांबलेला पाऊस अद्याप सुरू झाला नाही. यामुळे ओलिताची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना पिकांना जगविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. वर्धा तालुक्यातील अनेक गावांत पिकांना मजुरांकडून पाणी देऊन जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सिंचनाच्या सुविधा वाढत असल्या, विविध योजना असल्या तरी जिल्ह्यात कोरडवाहु क्षेत्रच अधिक असल्याचे कृषी विभागाचे आकडे सांगतात. यामुळे अर्ध्याधिक शेतकऱ्यांना पिके जगविण्याची केविलवाणी धडपड करावी लागत आहे. काही भागात मजुरांकडून तर कुठे शेतकरी स्वत: कुटुंबीयांसह पिके जगविण्याची धडपड करताना दिसतात. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिच्छा महावितरणचे भारनियमन करीत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने ओलित करणे कठीण झाले आहे. रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन ओलित करावे लागत असल्याचे दिसते.
पावसाने दडी मारल्याने उन्हामुळे कपाशी, सोयाबीन पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे बहुतांश शेतकरी मजूर लावून डब्याने झाडांना पाणी देताना दिसतात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत चालले आहे. एक-दोन दिवसांत पाऊस न आल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. काही भागात तर शेतकऱ्यांना पुन्हा नांगर फिरवून पेरणीची तयारी करावी लागत असल्याचे दिसते. पाऊस नसल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, मुंग, ज्वारी आदी पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. गत २० ते २५ दिवसांंपासून पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेती करणारा शेतकरी देशोधडीला लागला आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
सिंचनाची सोय असलेले शेतकरी रात्रं-दिवस स्प्रिंकलरच्या साह्याने ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. यात भारनियमन आड येत असल्याने शेतकऱ्यांना ते करणेही कठीण झाल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यात ९९ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या. पावसापूर्वी पेरणी केलेले पीक बऱ्यापैकी असले तरी सर्वच पिकांना दमदार पावसाची गरज आहे. अन्यथा पावसाने मारलेली दडी शेतकऱ्यांना दुबार पेरणीची नांदी ठरण्याची दाट शक्यता आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Kevilini tragedy to save the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.