वर्धेच्या युवकांकडून रॅम्पवर खादी वस्त्रांचे प्रदर्शन
By Admin | Published: February 10, 2017 01:29 AM2017-02-10T01:29:25+5:302017-02-10T01:29:25+5:30
महात्मा गांधी व विनोबा यांच्या अमूल्य तत्वांचा ठेवा जिल्ह्याच्या मातीत रूजलेला आहे. जगाच्या नकाशावर
महाविद्यालयीन युवकांचा फॅशन शो : सर्वांनी दर्शविले खादी आणि चरख्याचे अस्तित्त्व
वर्धा : महात्मा गांधी व विनोबा यांच्या अमूल्य तत्वांचा ठेवा जिल्ह्याच्या मातीत रूजलेला आहे. जगाच्या नकाशावर महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखला जाणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात महात्मा गांधी यांचा चरखा आणि खादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. यामुळेच मगन संग्रहालयाची खादी वर्धेतील युवकांचे आकर्षण ठरली आहे.
युवकांमध्ये गांधी व खादी या संकल्पनांची जागरुकता निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने व गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने ‘स्वतंत्रता का धागा-खादी’ या विषयावर वर्धेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकपात्री नाटक, समहूनाट्य, कथा कथन, पोस्टर, गीत लोककला आदितून गांधी व खादी विषयी आपले विचार व कल्पना व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमात बापुराव देशमूख अभियांत्रिकी महाविद्यालय, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधीग्राम कॉलेज, न्यू आर्टस कॉलेज, यशवंत महाविद्यालयातील कलादर्पण गु्रप सहभागी झाले होते.
यशवंत महाविद्यालय एनएसएस. गु्रप यांनी ‘आजचा शेतकरी व खादी’ या आजच्या परिस्थितीतील शेतकरी व खादी यांना जोडणारे समूहनाट्य सादर केले. धर्म, गांधी व राजकारण यांचे यथादर्शन न्यू आर्टसच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून दाखविले. स्वार्थी लोकांनी या गोष्टीचा आधार घेवून समाजाला तोडू नये हा संदेश यातून देण्यात आला.
एकपात्री नाट्य, खादीवर गीत, कवितांचेही सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आरंभी माधुरी दंडारे गांधीग्राम कॉलेज हिने ‘सुर निरागस हो’ यावर सादर केलेले भरतनाट्य फॉर्म नृत्य व फॅशन शो होते. मगनसंग्रहालयाच्या उरलेल्या खादी कपड्यातून अतिशय सुंदर कलात्मक डिझाईनचे लहान मुलांचे कपडे तयार करणाऱ्या विभागाद्वारे गुरुकुल विद्यानिकेतन देवळी येथील नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी ‘जंगल जंगल बात चली है’ या शिर्षकगीतावर फॅशन शो सादर केला. आजची युवापिढी आणि खादी यांचा आप्रतिम स्मरणीय अविष्कार बापुराव देशमुख व दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयाने केला. याचे निर्देशन विजय बाभुळकर, शुभम कलार्पण ग्रुप यांनी केले होते. मगनदीप भांडार, मगनसंग्रहालय यांच्या खादी कलेक्शनची अतिशय आकर्षक मांडणी व अपिल करणारे रॅप्म वॉक व चेहऱ्याचे हावभाव व त्याला अतिशय संर्पक जोड असणारे पार्श्वसंगित यांचा अतिशय युनीक संगम या फॅशन शो द्वारे प्रेक्षकांनी अनुभवला. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट असे की गांधीग्राम फॅशन डिझाईनिंगच्या विद्यार्थिनी खादी कापड घेऊन स्वत: डिझाईन केलेले खादी गारमेंट अतिशय आकर्षक रंग संगती व वैशिष्टपूर्ण डिझाईन याचे खादी माध्यमातून अतिशय उत्कृष्ट प्रेझेंटेशन या फॅशन शो द्वारे करण्यात आले.
फॉर्मल, ट्रेडिशनल राऊंड असे फॅशनशोचे स्वरुप होते. अभिजीत बुरडकर यांनी शेवटी दोन गीत सादर केले. खादी व युवा या वीरतरुण संकल्पनेला जोडून गांधी विचार रुजविण्याचा प्रयत्न मगन संग्रहालयाचा हा प्रयत्न आहे. संचालन मुकेश यांनी केले. यावेळी मगनसंग्रहालय अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता, संजय इंगळे तिगावकर, रंजना पाठक, ग्रांधीग्राम कॉलेजच्या अध्यक्षा सुनीता शेंडे, यशवंत विद्यालयाचे पारेकर व मगनसंग्रहालय कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)