यंदा ४.१८ लाख हेक्टरवर खरीप
By Admin | Published: April 25, 2017 12:55 AM2017-04-25T00:55:34+5:302017-04-25T00:55:34+5:30
खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे.
६३ हजार ५७५ क्विंटल बियाणे तर ७३ हजार ४०० मे.ट. खताची गरज
वर्धा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे. यात कापूस २ लाख २२ हजार हेक्टर, सोयाबीन १ लाख ९ हजार २५० हेक्टर, तूर ७७ हजार ७०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. गत वर्षीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र ६ हजार ७०० हेक्टरने वाढणार असून सोयाबीन पिकाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारीच्या पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना सभाध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी दिल्यात.
विकास भवन येथे खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आ. रणजीत काबंळे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती रिता गजाम, सोनाली गरडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी खळीकर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे उपस्थित होते.
या खरीपाकरिता ६३ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केली असून २४ हजार ४६२ क्विंटल बियाणे महाबीज कडून तर ३९ हजार ११४ क्विंटल बियाणे इतर कंपन्या पुरविणार आहे. तसेच ७३ हजार ४०० मेट्रीक टन खताची गरज आहे. जिल्ह्यात ठिंबक सिंचनाचा वापर वाढत असल्यामुळे ठिंबक संचामधून देता येतील, अशी विद्राव्य खते कृषी केंद्रामध्ये उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना आ. कुणावार यांनी दिल्या.
बँक अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार
वर्धा : खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये पीक कर्जाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच इतर बँकाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. तसेच पीक कर्जाचे वितरण करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन नियोजन करावे.(प्रतिनिधी)
३० मे पूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचना
खरीप हंगाम २०१७-१८ साठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्यासोबतच बँकांनी ३० मे पूर्वी ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरीत करावे, अशा सूचना खरीप हंगाम आढावा बैठकीचे अध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी केल्यात. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली.
सरकारी कंपन्यांवर कारवाई
भूईमुगांच्या प्रात्याक्षिकासाठी शेतकऱ्यांना नॅशनल सिड्स कॉर्पोरेशनने पुरविलेले बियाणे बोगस निघाले यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे प्रकरण खासगी कंपन्याबाबत घडले असते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तोच नियम सरकारी कंपन्यांना लागू करून त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या आहेत.