खरीप पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका ‘लेटलतीफ’
By Admin | Published: June 1, 2015 02:19 AM2015-06-01T02:19:33+5:302015-06-01T02:19:33+5:30
७१0 कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ २४७ कोटींचे वाटप; २५ हजार शेतक-यांना मिळाला लाभ.
संतोष वानखडे / वाशिम : पेरणीचा हंगाम ८-१0 दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही शेतकर्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत असल्याची साक्ष आकडेवारी देत आहेत. अलाहाबाद व बँक ऑफ इंडियाचा अपवाद वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीककर्ज वाटप फारसे गांभीर्याने घेतले नाही. ७१0 कोटींच्या उद्दिष्टांपैकी २५ हजार ९३ शेतकर्यांना २४७ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे विद्यमान ह्यव्यवस्थाह्ण शेतकर्यांचा जणू ह्यअर्थह्णच काढून घेत आहे. यात निसर्गाचा लहरीपणा अधिकच भर टाकत आहे. इतरांना भरभरून देणारा, स्वत:च्या घामरुपी सिंचनातून अन्नधान्याचे उत्पादन करणारा देशाचा पोशिंदा शेतकरी स्वत: मात्र शोषित जिणे जगत असल्याची विदारक स्थिती आहे. २0१४ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रबीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. सोयाबीनचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीककर्जरूपी कुबड्यांच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय या बँकांचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँका फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्यांना येत आहे. मार्च महिन्यापासूनच पीककर्जाच्या वितरणात आघाडी घेणार्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मे महिन्यापर्यंत २१0 कोटींहून अधिक खरीप पीककर्जाचे वाटप केले आहे. अलाहाबाद बँकेने ४.७८ पैकी ३.८४ कोटी, बँक ऑफ इंडियाने ४.९५ पैकी तीन कोटी, कॅनरा बँक १.९६ कोटीपैकी ६५ लाख, युनियन बँक ऑफ इंडिया ४.३७ पैकी १.४५ कोटी, आयसीआयसीआय ४.९१ पैकी १.८२ कोटी असे प्रमुख बँकांचे कर्जवाटप आहे. अन्य बँकांनी उद्दिष्टपूर्तीचे १0 टक्केही गाठले नाहीत.