नोटानंतर खताची बोगसगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:49 PM2019-05-10T21:49:10+5:302019-05-10T21:49:56+5:30
बनावटी चलन बाजारात चालविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी राजू भाष्कर इंगोले रा. नांदोरा (ड.) ता. देवळी याला पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बनावटी चलन बाजारात चालविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी राजू भाष्कर इंगोले रा. नांदोरा (ड.) ता. देवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून तो बोगस खत तयार करून त्याची विक्रीही करीत असल्याचे पुढे आले आहे. त्याच्या कारला चौक परिसरातील गोदामातून सुमारे सहा लाखांचे खत जप्त करण्यात आले आहे. बोगस खत व नियम डावलून खताची साठवणूक केल्या प्रकरणी इंगोले याच्याविरुद्ध गुरूवारी सावंगी (मेघे)े पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
खरीपाच्या सुरूवातीला बोगस बियाणे व खत बाजारपेठेत येऊ नये यासाठी कृषी विभाग विशेष प्रयत्न करते. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून वेळोवेळी आवाहनही केले जाते. मात्र, बनावट चलन बाजारपेठत आणण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी देवळी तालुक्यातील नांदोरा (डफरे) येथील राजू इंगोले याच्याविरुद्ध पोलिसांनी वेळीच शिकंजा कसला. त्याला अटक करून न्यायालयात हजर करीत त्याची चार दिवसीय पोलीस कोठडीही समुद्रपूर पोलिसांनी मिळविली.
याच दरम्यान सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वळता झाला. पोलीस कोठडीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंगोले याच्या कारला चौक परिसरातील एका गोदामावर छापा टाकून झडती घेतली असता तेथे बनावट चलन प्रिंट करण्यासाठी लागणारे विविध साहित्य आढळून आले. शिवाय मोठ्या प्रमाणात रासायनिक खत आढळून आल्याने याची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञांनी पाहणी केली असता ते खत बोगस असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात महाठगबाज ठरत असलेल्या राजू भाष्कर इंगोले याच्याविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई व्हावी या हेतून तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीवरून गुरूवारी सावंगी पोलीस ठाण्यात आरोपी राजू इंगोले याच्याविरुद्ध भादंविच्या ३२० सहकलम ३(२), डी, ७, जीवनावश्यक वस्तू अधिनियम सहकलम ७,१९ (सी), ३,१९ सी, ५ रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ अन्वये गुन्ह्याची नोंदही घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष
सावंगी पोलीस ठाण्यात राजू इंगोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तो सध्या न्यायालयाच्या आदेशावरून कारागृहात आहे. बनावट नोटा प्रकरणी सुरूवातीला त्याची चार दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली होती. तर आता पुन्हा बोगस खत प्रकरण उजेडात आल्याने शिवाय तसा गुन्हाही दाखल झाल्याने पोलीस काय भूमिका घेत न्यायालयात बाजू मांडेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
परवाना निलंबनाच्या कारवाईची शक्यता
आरोपी राजू इंगोले याच्याकडे पार्थ कृषी केंद्र नांदोरा (डफरे) ता. देवळी या नावाने खत, बियाणे या कृषी साहित्य विषयक परवाना आहे. परंतु, कृषी विभागाने दिलेल्या नियम व अटींना आरोपी इंगोले यांनी फाटाच दिल्याने त्याचा कृषी केंद्राचा परवाना निलंबित होण्याची शक्यता आहे; पण ही कारवाई कृषी विभाग केव्हा करतो याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.
चौकशीसाठी कोठडी ठरतेय अडचण
बोगस खत व नियम डावलून खताची साठवणूक केल्या प्रकरणी राजू इंगोले याच्याविरूद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी आरोपी इंगोले हा सध्या न्यायालयाच्या आदेशावरून कारागृहात आहे. त्यामुळे बोगस खत प्रकरणाच्या चौकशीत आरोपी इंगोलेची न्यायालयीन कोठडी तपास यंत्रणेच्या अडचीत भर टाकणारीच ठरत आहे.
बनावट नोटा प्रकरणी तपास आमच्याकडे आल्यानंतर कारला चौक भागातील गोदामावर छापा टाकून केलेल्या कारवाईदरम्यान प्रिंटर व इतर साहित्य आढळून आले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात रासायनिक खत आढळून आल्याने याची माहिती आम्ही कृषी विभागाला दिली होती. त्यानंतर कृषी विभागाने सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शाखा, वर्धा.
बोगस खत अनेकांना विकल्याचा अंदाज
महाठगबाज राजू इंगोले याने जादा मोबदला कमविण्याच्या लोभात बोगस खत अनेकांच्या माथी मारल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून वर्तविला जात आहे. शिवाय राजू इंगोलेच्या ठगबाजीच्या जाळ्यात कुठले कुठले शेतकरी अडकले याची माहितीही सध्या कृषी विभाग जाणून घेत आहे; पण सध्या त्यांच्या या प्रयत्नाला पाहिजे तसे यश मिळाले नसल्याचे वास्तव आहे.
बोगस खत तयार करून त्याची विक्री करणाºया राजू इंगोले विरुद्ध कृषी विभागाने फौजदारी कारवाई केली आहे. राजू इंगोले याने बोगस खत कुठल्या शेतकºयाला विक्री केले असल्यास त्या शेतकºयाने तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी. शिवाय दक्ष राहूनच शेतकºयांनी बियाणे व खताची खरेदी करावी. काही शंका आल्यास त्याची माहिती तातडीने कृषी विभागाला द्यावी. त्वरीत योग्य कारवाई करण्यात येईल.
- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.