मोझरी परिसरातील मार्गांवर खड्डाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:03 PM2019-07-07T23:03:32+5:302019-07-07T23:04:19+5:30
ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याची ओरड नागरिक करीत आहे.
मोझरी (शे.) : ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याची ओरड नागरिक करीत आहे.
मोझरी (शेकापूर) हे जिल्ह्याच्या टोकावरील गाव असून जिल्हा परिषदेचे सर्कल आहे. या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी वारंवार केली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नाही. कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर खड्डे पडले असून आता रस्त्यांवरील गिट्टीही बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात किंवा रस्त्यावर आलेल्या गिट्टीवरुन वाहने घसरुन अपघात होत आहे. आता पावसाचे दिवस असल्याने
पावसामुळे रस्त्यावरील खड्डयात पाणी साचले आहे. या पाणी साचलेल्या खड्डयांचा वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरील वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहे.
मोझरी-कानगाव मार्गावरील ३ कि.मी.पर्यंतचा मार्ग खड्डेमय स्थितीत आहे. तर मोझरी-खानगाव-आंबोडा हा १० कि.मी. पैकी ४ कि.मीचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. मोझरी-पोटी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आणि नाल्यावरील पुलांना भगदाड पडले आहे. मोझरी-कोसुर्ला-मनसावळी मार्गावरील गिट्टी पूर्णपणे उखडली आहे. तसेच पुलाची अवस्था बिकट झाली आहे.