खीर शिजवून केले नोटबंदीचे वर्षश्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:35 AM2017-11-09T00:35:17+5:302017-11-09T00:35:30+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी काँगे्रसद्वारे खीर शिजवून नोटबंदीचे वर्षश्राद्ध करीत निर्णयाचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी काँगे्रसद्वारे खीर शिजवून नोटबंदीचे वर्षश्राद्ध करीत निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलकांनी वाढती महागाई, गॅस सिलिंडरची दरवाढ आणि शेतकºयांच्या विविध समस्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. रणजीत कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
केंद्रातील भाजपा सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला एक वर्षाचा कालावधी लोटला; पण नोटबंदीचा सांगितलेला उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. नोटबंदीचा निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या केवळ अडचणीत वाढ करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काँगे्रसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ खीर शिजविण्यात आली. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. रणजीत कांबळे यांच्यासह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. आंदोलनात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विजय जयस्वाल, देवळीचे नगरसेवक सुनील बासू, गौतम पोपटकर, सुरेश वैद्य, मनोज चौधरी, बाबू टोणपे, मनीष साहू, बालू महाजन, बाबाराव पाटील, शेखर शेंडे, इक्राम हुसेन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्य सरकार शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही
विरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते; पण सत्तेत आल्यावर त्यांच्यात काहीसा बदल झाला आहे. ते शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे कानाडोळा करीत असून गंभीर नाहीत. नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. सध्या सोयाबीन व कपाशीला योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे; पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ केली जात असल्याने गृहिणींना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वाढती महागाईवर अंकूश लावण्यासाठी आणि शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पावले उचलावित, अशी मागणी यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. रणजीत कांबळे यांनी केली.
राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे धरणे, मृतकांना श्रद्धांजली
नोटबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. एक वर्षापूर्वी पंतप्रधानांनी रात्री नोटाबंदीचा निर्णय घेऊन ५०० व १००० रुपयांच्या चलनातील नोटा बाद केल्या. भ्रष्टाचाराला लगाम लागावा व काळा पैसा बाहेर यावा, नकली नोटा बाहेर याव्या, दहशतवाद्यांना पुरवठा होणारा पैसा थांबावा हा त्यामागील उद्देश होता; पण तो सफल झाला नाही. या निर्णयाविरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिवाजी चौकात काळ्या फिती लावून निषेध केला. शिवाय जीव गमविलेल्या १२० जणांना रायुकाँने श्रद्धांजली अर्पण केली.
नोटबंदीचा निर्णय सामान्यांचा जीव घेणारा ठरला. यामुळे बँक कर्मचाºयांचा बळी तर गेलाच; पण सामान्यांच्या आर्थिक परिस्थितीवर घाला घातला गेला. निर्णयाचा उद्देश सफल झाला नाही. उलट देशाच्या आर्थिक परिस्थितीवर विपरित परिणाम झाला. नोटबंदीमुळे सामान्य जनता देशोधडीला लागली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी असे सर्व घटक अडचणीत आले. उद्योगधंदे बंद पडले असून युवकांना नोकरीस मुकावे लागले. परिणामी, बेरोजगारांचे प्रमाण वाढून निर्णयाने काहीही साध्य झाले नाही.
देशाची अर्थव्यवस्था या निर्णयामुळे कमकुवत झाली. एक वर्ष पूर्ण होऊनही ती पूर्वपदावर आली नाही. नोटबंदीमुळे सरकार तोंडघशी पडले असून अपयश झाकण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून यशस्वी झाल्याचा कांगावा करीत आहे, असे मत धरणे आंदोलनात महिला अध्यक्ष शरयू वांदिले, पं.स. सदस्य संदीप किटे, प्रफुल्ल मोरे, अंबादास वानखेडे, विनय डहाके, उत्कर्ष देशमुख, सोनल ठाकरे, राहुल घोडे यांनी व्यक्त केले. आंदोलनात संजय काकडे, विक्की खडसे, डॉ. कोल्हे, शारदा केने, विणा दाते, निखिल येलमुले, राहुल घोडे, वैेभव चन्ने, संदीप पाटील, नयन खंगार, अमित लुंगे, संकेत निस्ताने आदी सहभागी झाले होते.