महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:16+5:30

रविवार ८ रोजी रात्री उशीर होऊनही संजय घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने सोमवार ९ रोजी संजय हा घरून बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. बेपत्ता असलेला संजय नेमका कुठे आहे याचा शोध शहर पोलीस घेत असतानच बुधवारी सकाळी बोरगाव (मेघे) परिसरातील कोचर जिनिंग लगत असलेल्या मोकळ्या मैदानातील विहिरी शेजारी संजयचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

Killing of Mahavitaran's contract worker | महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

Next
ठळक मुद्देनऊ दिवसानंतर सापडला बोरगाव (मेघे) शिवारात मृतदेह : पोलिसांकडून कारणांचा घेतला जातोय शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील नऊ दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृतदेह बुधवारी बोरगाव (मेघे) परिसरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृतकाच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जंगलू वरखेडे (३९) रा. बोरगाव (मेघे) असे मृतकाचे नाव असून त्याची हत्या कुठल्या कारणाने करण्यात आली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी एका महिलेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
रविवार ८ रोजी रात्री उशीर होऊनही संजय घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने सोमवार ९ रोजी संजय हा घरून बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. बेपत्ता असलेला संजय नेमका कुठे आहे याचा शोध शहर पोलीस घेत असतानच बुधवारी सकाळी बोरगाव (मेघे) परिसरातील कोचर जिनिंग लगत असलेल्या मोकळ्या मैदानातील विहिरी शेजारी संजयचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगपात यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. त्यावेळी मृतक संजयचे हात व पाय बांधून असल्याचे तसेच त्याच्या डोक्यावर जखम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कुठल्यातरी कारणावरून संजयची हत्याच करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

रामनगराच्या कार्यालयात होता कार्यरत
मृतक संजय वरखेडे हा बोरगाव (मेघे) भागातील गणेशनगर येथील रहिवासी होता. असे असले तरी तो महावितरणच्या रामनगर येथील कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मागील काही दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने त्याचा शोध त्याच्या निकटवर्तीयांकडून घेतल्या जात होता. दरम्यान संजयचा मृतदेह बोरगाव (मेघे) भागात संशयास्पद स्थितीत आढळून आला.

मंगळवारी काळोख ठरला अडथळा
संजय वरखडे याला काहींनी बोरगाव (मेघे) भागातील कोचर जिनिंगलगत शेवटचे बघितले अशी माहिती मिळताच शहर पोलिसांच्या चमूने मंगळवारी सायंकाळच्या सूमारास त्या भागाची पाहणी केली. परंतु, अवघ्या काही काळातच रात्र झाल्याने पोलिसांच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा शहर पोलिसांनी त्याच परिसराची बारकाईने पाहणी केली असता संजयचा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले. मृतकाच्या हातावर गोंदविलेले होते. त्याच गोंदवलेल्या खुणावरून मृतकाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीचा शोध घेण्यासाठी चक्र फिरविले.

मिसिंगच्या तक्रारीनंतर दोघांची झाली चौकशी
संजय वरखडे हा बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेत चौकशी केली. परंतु, तेव्हा काहीच हाती न लागल्याने पोलिसांनी खबºयांकडून माहिती घेण्यास सुरूवात केली. दरम्यान बेपत्ता असलेल्या संजयचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पुरावे नष्ट करण्याचा झाला प्रयत्न
मृतक संजयच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची इजा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. आरोपींनी संजयला मारहाण करीत त्याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह हातपाय बांधून त्याला कोचर जिनिंगच्या शेजारी टाकला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.

श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना केले होते पाचारण
बुधवारी सकाळी शहर पोलिसांकडून घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. विहिरीत पाण्यात ऑईल मिळून आल्याने तत्काळ मोटारपंप लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात आले; पण संजयची दुचाकी मिळून आली नाही. विशेष म्हणजे संजयच्या हातावरील गोंदलेल्या खुणावरून संजयच्या आईने त्याचा मृतदेह ओळखला.

खबऱ्याची माहिती ठरली फायद्याची
मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या संजयचा सर्वत्र शोध घेतल्या जात असतानाच शहर पोलीस त्यांच्या खबºयांकडूनही माहिती घेत होते. अशातच खात्रीदायक माहितीवरून बोरगाव (मेघे) भागातील कोचर जिनिंग शेजारच्या मैदानात पाहणीदरम्यान संजयचा मृतदेह आढळून आला. एकूणच खबऱ्याकडून मिळालेली माहिती पोलिसांना या प्रकरणात फायद्याची ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
उलट-सुलट चर्चला उधाण
संजयची हत्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने केली असावी किंवा गुप्तधनाच्या कारणावरून करण्यात आल्याची चर्चा सध्या बोरगाव (मेघे) परिसरात होत आहे. असे असले तरी पोलीस तपासात संजयची हत्या कुणी व कुठल्या कारणाने केली हे पुढे येणार आहे.

Web Title: Killing of Mahavitaran's contract worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून