घर कोसळल्याने कोंडवाड्याचा आसरा
By admin | Published: March 10, 2016 02:59 AM2016-03-10T02:59:59+5:302016-03-10T02:59:59+5:30
कोणताही गरीब घरकुलापासून वंचित राहू नये हा शासनाचा प्रामाणिक आहे. असे असतानाही विरूळ (आ.) येथील गरीब कुटुंबावर
जगण्याची अगतिकता : बीपीएलधारक असताना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ नाही
सचिन देवतळे विरूळ(आकाजी)
कोणताही गरीब घरकुलापासून वंचित राहू नये हा शासनाचा प्रामाणिक आहे. असे असतानाही विरूळ (आ.) येथील गरीब कुटुंबावर राहते घर कोसळल्याने चक्क जनावरांच्या कोंडवाड्याचा आसरा घेत राहण्याची वेळ आली आहे.
येथील गजानन जवने हे पत्नी, मुलगा व मुलीसोबत राहतात. तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात त्यांचे राहते घर पूर्णत: कोसळले. त्यामुळे एकाच दिवसात त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने भाड्याच्या घरात राहणे त्यांना परवडणार नव्हते. तसेच हाती पैसा नसल्याने घरही बांधणे त्यांना शक्य नाही. परिणामी गावात ज्या कोंडवाड्यात मोकाट गुरे कोंडली जातात त्या कोंडवाड्यात एका कोपऱ्यात या परिवाराला राहण्याची वेळ आली आहे. गत पाच वर्षापासून सदर कुटुंब शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ मिळावा म्हणून आर्वी पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाच्या चकरा मारत आहे. पण अद्यापही त्यांना घरकूल योजनेचा लाभा मिळालेला नाही.
या परिवाराची बिकट परिस्थिती येथील लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून लपलेली नाही. असे असतानाही कुणीही या गरीब कुटुंबाकडे लक्ष देण्यात तयार नाही. हक्काचे घरकूल मिळावे यासाठी या कुटुंबाचा आटापीटा सुरू आहे. याच गावातील पांडुरंग चाफले या वृद्ध दाम्पत्याचे घरही दोन वर्षापूर्वी पूर्णत: कोसळले. सोबतच येथील छबुबाई बुरे यांचेही घर पूर्णत: मोडकळीस आले आहे. ही तीनही कुटुंबे दोन ते तीन वर्षापासून घरकुल योजनेची वाट पाहावी लागत आहे. गत काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा सामना सर्वांनाच कारावा लागत आहे. वचेवर गारपीटही होत आहे. त्याचा त्रासही सदर कुटुंबांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या कुटुंबाला घरकूल योजनेचा फायदा करून देण्याची मागणी गावकरी करीत आहे.