कोरानाने सगेसोयरेही दुरावले, मृतदेहाला शिवण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:03 AM2020-06-06T11:03:34+5:302020-06-06T11:04:20+5:30
ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मानवी हक्काचे उल्लंघनच असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ चा देशात शिरकाव झाला आणि अवास्तव भीतीचा डोंब उठविण्यात आला. कोरोना विषाणूने कुणाचा पती, कुणाची पत्नी, कुणाची आई, कुणाचे वडील तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. ज्यांनी आपल्या परिवारात आपल्या आठवणी कायम ठेवल्यात, ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मानवी हक्काचे उल्लंघनच असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी देशात अनेक संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्यावेळीही जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उपाययोजनांप्रमाणेच सूचना दिल्या होत्या. तेव्हाही आजाराच्या संक्रमणात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. मात्र, आता सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांच्या व्यापकतेमुळे कोरोनाची भयावह स्थिती निर्माण करण्यात आली. प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाबत अतिजागरुक झाल्याने जीवाच्या भीतीपोटी जिवलगांना दूर सारू लागली आहे. रक्ताचे नातेही दुरावल्याने परकीयांनी किंवा प्रशासनाने स्वीकार केल्याचेही पुढे आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला समाजाने अघोषित बहिष्कृत केल्याचीही उदाहरणे आहेत. यावरच न थांबता कोरोनाबाधित मृतदेहाचे भारतीय लोकांनी अंत्यसंस्कार रोखण्याच्या अनेक त्रासदायक घटना देशभरात घडल्याची नोंद आहे. कोरोनाच्या अनाठायी भीतीपोटी नातेवाईक सुद्धा रुग्णालयाने सरकारी नियमानुसार योग्यप्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहाला रुग्णवाहिका किंवा व्हॅनमध्ये हलविताना तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह सरणावर (चितेवर) ठेवताना किंवा दफन करताना स्पर्श करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णालयीन परिचारक व पोलिसांना ही कामे करावी लागत आहेत. मृतदेहापासून कोणताही धोका नाही, हे पटवून देत नागरिकांच्या मनामधील कोरोनाची भीती दूर करून कोरोनासोबत लढायला शिकविण्याची गरज व्यक्त होत आहे.
मृतदेहाला स्पर्श करण्याची मागितली परवानगी
कोविडने संक्रमित असलेल्या मृतदेहापासून खूप धोका असतो, ही अकारण भीती दूर करण्यासाठी वर्धा येथील न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी डॉक्टरांनी सरकारी नियमानुसार योग्यप्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहास कोविड रुग्णालयात किंवा स्मशानभूमीत पीपीईविना स्पर्श करण्याची संमती मागितली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे. विविध प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित (उदा. एच.आय. व्ही, टी.बी., इन्फ्युएन्झा इत्यादी.) असलेल्या मृतदेहांशी शवविच्छेदनादरम्यान वारंवार संपर्क येतो. काही ठिकाणी सरकारने कोविड संक्रमित मृतदेह स्मशानभूमीत हाताळण्यासाठी पीपीई घालून परिचारक नियुक्त केले आहेत. परंतु, त्यामुळे रुग्णालयाने सरकारी नियमानुसार योग्य प्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहापासूनसुद्धा खूप धोका आहे, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.
रुग्णालयाने योग्यरितीने संपूर्णपणे पॅक केलेल्या मृतदेहाला स्पर्श केल्यामुळे कुठलाही धोका नाही. तसेच अशा पॅक केलेल्या मृतदेहाला हाताळण्यासाठी पीपीईचीसुद्धा गरज नाही. केवळ मृतदेहाशी प्रत्यक्ष संपर्क येणे व त्याचे चुंबन वैगेरे घेणे टाळणे अपेक्षित आहे. याची माहिती जनतेला देऊन जनजागृती करण्याची गरज आहे.
डॉ. इंद्रजित खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ, सेवाग्राम.