कोटेश्वर देवस्थान होणार पर्यटन हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:05 AM2017-12-29T00:05:27+5:302017-12-29T00:05:55+5:30

देवळी तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या कोटेश्वरला शासनाने तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे. तत्कालीन पर्यटन विकास राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी या देवस्थानासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता.

Koteshwar Devasthan will be the tourist hub | कोटेश्वर देवस्थान होणार पर्यटन हब

कोटेश्वर देवस्थान होणार पर्यटन हब

googlenewsNext
ठळक मुद्देविकास कामे प्रगतिपथावर : झुलता पूल ठरणार वैशिष्ट्य

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या कोटेश्वरला शासनाने तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे. तत्कालीन पर्यटन विकास राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी या देवस्थानासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. यामुळे विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून आता कोटेश्वर उदयास येत आहे. विश्रामगृह, किचन शेड, रेस्ट्रॉरेन्ट, पूजेसाठी शेड, शौचालय, स्वच्छतागृह, बागबगीचा आदींमुळे कोटेश्वर देवस्थानचा चेहरामोहराच बदलत असल्याचे प्रत्यक्ष भेटीत पाहावयास मिळाले.
काँग्रेस शासनाच्या काळात राज्यातील काही महत्त्वाची पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा प्रदान करण्यात आला. यात कोटेश्वर देवस्थानाला ब दर्जा मिहाला. शिवाय भरघोस निधीची तरतूदही करण्यात आली. बांधकाम विभागाच्या साह्याने कोटेश्वर देवस्थानच्या ऐसपैस जागेवर विकास कामांचा आराखडा तयार केला गेला. त्यानुसार कामांना प्रारंभ झाला. साधारण तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले काम प्रगतिपथावर आहे. आजपर्यंत नऊ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. यात सर्वप्रथम घाट तथा तेथील पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. यानंतर रेस्ट्रॉरेन्ट व विश्रामगृहाचे काम करण्यात आले. विदर्भातून तथा अन्य ठिकाणांहुन येणाऱ्या भाविकांना अल्पोपहार मिळावा, तेथे थांबता यावे म्हणून विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराच्या सभोवताल संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय भोजन शेड, किचन शेड, पुजेसाठी शेड तथा शौचालय, स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे. नऊ कोटीमध्ये ही कामे झाली असून एकूण ११.५० कोटी रुपयांच्या निधीतून कोटेश्वरचा कायापालट करण्यात येत आहे. अद्याप दुसऱ्या टप्प्यातील निधी आला नसला तरी तो लवकरच प्राप्त होणार असून कामात खंड पडणार नसल्याचे सांगण्यात आले. पर्यटन विकासाच्या निधीतून कोटेश्वर देवस्थानचे रूपडे पालटण्याचा प्रयत्न होत आहे. विकास कामे करीत असतानाच वृक्षारोपण करण्यात आले आहे. शिवाय बगिचा तयार केला जात असून संपूर्ण परिसर हिरवळ आच्छादित केला जाणार आहे.
कोटेश्वर येथे वर्धा नदी उत्तरवाहिनी होऊन वाहते. या ठिकाणी महादेवाचे पुरातनकालीन मंदिर आहे. या मंदिराचे महात्म्य मोठे असून पिंडीवर वाढलेल्या कडुलिंबाची पानेही गोड लागतात, अशी आख्यायिका आहे. शिवाय उत्तरवाहिनी वर्धा नदी असल्याने अनेक पूजाविधी पार पाडण्यासाठी भाविक येथील घाटावर येतात. शिवाय पवित्र स्रानाकरिताही विदर्भासह राज्यातील भाविक गर्दी करतात. या भाविकांना सुविधा मिळाव्या म्हणून पर्यटन विकास निधीतून कोटेश्वरचे सौंदर्यीकरण केले जात आहे. लवकरच ही कामे पूर्ण होऊन कोटेश्वरला पर्यटन स्थळाचे ‘लूक’ येणार असल्याचा विश्वास कंत्राटदार, बांधकाम विभाग व माजी पं.स. सभापती मनोज वसू यांनी व्यक्त केला. कोटेश्वर बॅरेज होणार असल्याने बॅक वॉटर राहणार आहे. याचाही लाभ पर्यटनाला होणार आहे.
पार्किंगसाठी मोकळी जागा
कोटेश्वर देवस्थानात पूर्वी नदीवरील घाटापर्यंत वाहने नेली जात होती. शिवाय मंदिर परिसरातही वाहने उभी केली जात होती. आता विश्रामगृहाजवळ पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी चारचाकी तथा दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले जात आहे.
थाटेश्वर मंदिराला जोडणारा पूल
वर्धा नदी पात्राच्या दोन्ही बाजूला मंदिरे आहेत. ही कोटेश्वर व थाटेश्वर मंदिरे जोण्याकरिता झुलता पूल बांधण्यात येणार आहे. हा विदर्भातील पहिला पूल राहणार असून तो भाविकांचे आकर्षण ठरणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
कोटेशवर देवस्थानच्या विकास कामांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. संपूर्ण कामे पूर्ण होईस्तोवर पर्यटन स्थळाचे शुल्क म्हणून पार्किंग शुल्क आकारण्याच्या सूचनाही केल्यात. त्यावर अवलंब करण्यात आला आहे. शिवाय अन्य कामांबाबतही अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांना सूचना केल्या. त्यांच्या सोबत अधिकारी, मनोज वसू, कंत्राटदार पगडाल आदी उपस्थित होते.
धर्मशाळेचाही विकास
कोटेश्वर देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांना मुक्काम करता यावा. स्वयंपाक करता यावा म्हणून धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेचाही विकास करण्यात आलेला आहे. धर्मशाळेची दुरूस्ती व सुशोभिकरण करण्यात आले आहे.

पर्यटन विकासातून कोटेश्वरचा प्रकल्प मंजूर केला. आपल्या कार्यकाळात हे काम सुरू झाले. कोटेश्वर येथे उत्तरवाहिनी असल्याने नागरिकांचे तथा आमचेही श्रद्धास्थान आहे. देवस्थानाच्या विकासासाठी प्रथम पाच कोटीचा निधी आला होता. यानंतर पुन्हा निधी आला असून काम प्रगतिपथावर आहे. थाटेश्वर हे नदीच्या पलिकडे असून येथे झुलत्या पुलाद्वारे दोन्ही मंदिरे जोडली जातील. ही कामेही लवकरच पूर्ण होतील. कोटेश्वर बॅरेजमुळे बॅक वाटर राहणार असून पर्यटनाला लाभ होईल.
- रणजित कांबळे, आमदार, पुलगाव-देवळी विधानसभा मतदार संघ.

Web Title: Koteshwar Devasthan will be the tourist hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.