जिल्ह्यातील ३६ एचआयव्हीसह टीबी ग्रस्तांनी हरविले कोविड-१९ विषाणूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 AM2020-11-23T05:00:00+5:302020-11-23T05:00:12+5:30
जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा धोका मोठा असल्याने टीबी आणि एचआयव्ही सोबत जगणाऱ्या व्यक्तींचीही जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे. एखादी एचआयव्ही तसेच टीबीग्रस्ताला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान होताच त्याला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ३७ टीबी आणि एचआयव्ही ग्रस्तांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी ३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्ही सोबत जीवन जगत आहेत. त्यापैकी ३१८ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर नऊ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला. या एचआयव्ही ग्रस्तांना वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते कोविडमुक्त झाले आहे.
लक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणी
नियमित औषधोपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यावर एचआयव्ही सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीची तातडीने कोविड चाचणी केली जाते. तर टीबी सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याची तातडीने कोविड चाचणी केली जात आहे.
अतिजोखिमेच्या व्यक्तींवर अधिकाऱ्यांची करडी नजर
जिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्हीसोबत तर ५७६ व्यक्ती टीबीसोबत जीवन जगत आहेत. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीच कमी राहत असल्याने त्यांना कोरोना संकटाच्या काळात अतिजोखीमीची व्यक्ती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी तालुका स्तरासह जिल्हा स्थळावरील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी या व्यक्तींवर करडी नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्याचा आरोग्य विभाग तसेच यंत्रणेतील प्रत्येक व्यक्ती कोविडशी लढा देत आहे. आतापर्यंत एचआयव्ही व टीबीसोबत जीवन जगणाऱ्या ३७ व्यक्तींचा कोरोना संसर्ग झाला असला तरी त्यापैकी ३६ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत.
डॅा. अजय डवले,जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.