आता प्राथमिक आरोग्य केंद्रातही मिळणार कोविडची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 05:00 AM2021-03-05T05:00:00+5:302021-03-05T05:00:07+5:30
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात तीन खासगी लसीकरण केंद्र सूरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी लसीसाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. बुधवार ३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार २८६ व्यक्तींना लसीचा पहिला डोज तर ५ हजार ५९४ व्यक्तींना कोविड लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पहिल्या फळीतील कोविड योद्धानंतर अतिजोखीमेच्या व्यक्ती तसेच वयोवृद्धांना कोरोनाची लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यानंतर सध्या जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरणही केले जात आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये या हेतूला केद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रांवरून आता कोरोनाची लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले असून त्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या उपस्थितीत बड्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात तीन खासगी लसीकरण केंद्र सूरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी लसीसाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. बुधवार ३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार २८६ व्यक्तींना लसीचा पहिला डोज तर ५ हजार ५९४ व्यक्तींना कोविड लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. जेष्ठ नागरिकांसह अतिजोखमीच्या गटात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावातच कोविडची लस मिळावी तसेच तालुक्यांच्या तसेच शहरांच्या स्थळी असलेल्या लसीकरण केंद्रांवर लस घेणाऱ्यांची गर्दी होऊ नये या हेतूने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रातच नागरिकांना कोरोनाची लस नि:शुल्क देण्याचे निश्चित केले आहे. असे असले तरी सोमवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे. वर्धा जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे ५४ हजार १०० तर कोव्हॅक्सिनचे १७ हजार ४०० डोज प्राप्त झाले आहेत. हिच लस नागरिकांना दिली जाणार आहे.
लससाठा मुबलकच
वर्धा जिल्ह्याला आतापर्यंत ५४ हजार १०० कोविशिल्ड तर १७ हजार ४०० कोव्हॅक्सिनचे डोज मिळाले आहे. त्यापैकी १८ हजार २८६ व्यक्तींना लसीचा पहिला तर ५ हजार ५९४ व्यक्तींना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात कोरोनाची लस असून जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील १२ एमबीबीएस तर १६ बीएएमएस डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावपातळीवर आता लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावरून नागरिकांना कोरोनाची लस कशी देता येईल यावर गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. त्यादिशेने प्रत्यक्ष काम करण्यासाठी प्रयत्न होत आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर सोमवारी बहूतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांवरून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
या अडथळ्यांवर करावी लागेल मात...
तळेगावची इमारत निर्माणाधीन
तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्माणाधीन असून या गावात कसे लसीकरण केंद्र द्यावे, यासाठी सध्या विचार होत आहे.
अंतोरात नाही इमारत
अंताेरा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आरोग्य विभागाच्या मालकीची नसल्याने या गावात लसीकरण केंद्र कुठे द्यावे यावरही सध्या जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
तीन प्राथमिक केंद्रात नाही इंटरनेट सुविधा
जिल्ह्यात एकूण २८ प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी त्यापैकी तीन ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसल्याने या केंद्रांमध्ये तातडीने इंटरनेट सुविधा उपलब्ध करीत या ठिकाणांहून प्रत्यक्ष लसीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत आहेत.