सहा महिन्यांनंतर आर्वी तालुक्यात कोविड विषाणूचा संसर्ग ‘इन कंट्रोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:00 AM2020-12-28T05:00:00+5:302020-12-28T05:00:22+5:30
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका मृत महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने आणि तिच्या अंत्यविधीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून हिवरा तांडा गाव परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करून सात किमीचा परिसर सील करण्यात आला होता. असे असतानाही जिल्ह्याबाहेरून आलेल्यांमुळे आर्वी तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यातील पहिला कोविड बाधित आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथे सापडला. त्यानंतर बघता बघता आर्वी तालुका कोरोनाचा हॉटपॅाट होऊ पाहत होता. पण नंतर येथे उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी सक्तीची संचारबंदी लागू केली. शिवाय तालुका प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी जनजागृती केल्याने सध्या आर्वी तालुक्यात कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग ‘इन कंट्रोल’ आहे.
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका मृत महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने आणि तिच्या अंत्यविधीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून हिवरा तांडा गाव परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करून सात किमीचा परिसर सील करण्यात आला होता. असे असतानाही जिल्ह्याबाहेरून आलेल्यांमुळे आर्वी तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हाणच होते. अशातच उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी आर्वी शहरात सक्तीची संचालबंदी लागू केली होती.
या संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय कोरोना बाबात प्रभावी जनजागृती करण्यात आली. यासह करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे आर्वी तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. असे असले तरी पूर्वी ज्या भागात सर्वाधिक रुग्ण होते तेथे सध्या नाहीच्या बरोबरीनेच कोविड बाधित आहेत. विशेष म्हणजे आर्वी शहर आणि तालुक्यातील काही गावे ही दाटीवाटीची लोकवस्ती असून नागरिकांच्या सहकार्यामुळेच प्रशासनाला कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यात यश आले आहे. मागील सहा दिवसांचा विचार केल्यास तालुक्यात केवळ चार नवे कोविड बाधित सापडले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी तालुक्यातील नागरिकांसह तालुका वैद्यकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच तालुका प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले. तालुक्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी अजूनही कोरोनाचा धोेका कायम आहे, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
- डॉ. आशीष सोनी, नोडल अधिकारी, आर्वी.