कुसुमाग्रजांची कविता वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे जाणारी

By admin | Published: March 6, 2017 01:08 AM2017-03-06T01:08:21+5:302017-03-06T01:08:21+5:30

कुसुमाग्रजांच्या वैविध्यपूर्ण साहित्यातील अनेक ओळी आजही सुभाषितांसारख्या जनजीवनात वापरल्या जातात.

Kusumagraj's Poetry From Personality to Globalization | कुसुमाग्रजांची कविता वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे जाणारी

कुसुमाग्रजांची कविता वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे जाणारी

Next

पुरुषोत्तम माळोदे : विदर्भ साहित्य संघाचे कविसंमेलन
वर्धा : कुसुमाग्रजांच्या वैविध्यपूर्ण साहित्यातील अनेक ओळी आजही सुभाषितांसारख्या जनजीवनात वापरल्या जातात. त्यांच्या कवितेतील सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की त्यांच्या प्रेमकवितेतही भावनिक चिंतनच दिसून येते. त्यांची कविता ही वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे जाणारी आहे, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ शाखेद्वारे घेण्यात आलेल्या कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रारंभी विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडताना मराठी भाषा दिनाबाबतच्या विविध विचारप्रवाहांचा आढावा घेतला.
कविसंमेलनात जयश्री कोटगीरवार यांनी माझ्या मराठीचा संग, नित्य गाईल अभंग, नामा तुकोबाची वाणी, डोही आनंद तरंग, अशी मराठीची थोरवी गायली. तर असू तिला अपुल्या मनात, बोली अपुली माय मराठी, शब्द तिचेच बळ देतील, थोर पौष्टिक साय मराठी असे मायबोलीचे गुणगान प्रशांत पनवेलकर यांनी केले. कोण मी आता, हा प्रश्न सारखा पडे, कर्तृत्वातून माझ्या मलाच ओळख माझी सापडे’ अशी स्त्रीजाणिवा जोपासणारी कविता मंजूषा चौगावकर यांनी सादर केली. या शहरात खूप लोक राहतात, असे सांगताना प्रमोद नारायणे म्हणाले, गर्दीने व्यापून गेले आहे हे शहर, खचाखच भरलेल्या कुपीत खुप लोकं राहतात. काळोखात हरवून गेले आहे हे शहर, भयाण भरल्या कुशीत खूप लोक राहतात. मीनल रोहणकर यांनी स्त्रीचे चारित्र्य काचेचं असतं तर पुरुषांचे चारित्र्य काय पोलादी असतं? असा प्रश्न कवितेतून विचारला. तर, स्नेहल कुबडे हिने वाटतं मला शोधां आपणही नवीन काही नवं आकाश, नवे ढग, नवं तेज आणि अजून काही.. असा अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या कवितेतून केला. तर पृथ्वीचे प्रेमगीतही तुम्हीच गायले अमुच्यासाठी, नटसम्राटाच्याही बेघर होण्याच्या दुखाची कथा तुम्हीच ऐकविली. तुमच्याच शब्दांनी शिकवला आम्हाला आशावाद’ अशा शब्दात कल्पना माळोदे यांनी कुसुमाग्रजांचे स्मरण केले. संजय इंगळे तिगावकर यांनी मी पुत्र अमृताचा, ओवी अभंग माझे, छळते कशी कळेना ही गझलियत मलाही, ना मीर ना जफर मी, गालीब ना नाही जरी मी, माझी गझल तिथेही, आहे जिथे इलाही ही गझल सादर केली.
या काव्यमैफलीत प्रा. अरविंद पाटील, प्रभाकर उघडे, प्रभाकर पाटील, प्रशांत ढोले, पुरुषोत्तम माळोदे यांनीही कविता सादर केल्या. डॉ. स्मिता वानखेडे व रंजना दाते यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र मुंढे यांचा वि.सा. संघ शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते, प्रा. शेख हाशम, प्रा. पद्माकर बावीस्कर, प्रा. किशोर वानखेडे, संगीता इंगळे, शुभा भिडे, रमेश बोधनकर, राजेश इंगळे यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज- देशमुख
वर्धा : भाषा ही संवाद व्यवहाराचे माध्यम आहे. पृथ्वीवरील संपन्न व समर्थ भाषापैकी मराठी ही एक भाषा आहे. तिची प्राचीन काव्यसंपदा व गद्यसंपदा अलौकिक आहे. हेच तिच्या श्रीमंतीचे प्रधान कारण आहे. तसेच तिचे व्यवहरक्षेत्रही व्यापक आहे. मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे, असे मत प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी व्यक्त केले.
स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे मराठी विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या वतीने आयोज्जित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. खोडे होते. जगात मराठी बोलणाऱ्यांची संख्या अकरा लाख आहेत. या दृष्टिकोनातून विचार केल्यास जागतिक क्रमवारित मराठीचा एकोणविसावा क्रमांक लागतो. पटकथा लेखन, मोडीलिपी, गीत रचना, दुभाषी, शुद्धलेखन तपासणे, वृत्तपत्र, दुरदर्शन, अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी आहे, असे डॉ. खोडे यांनी सांगितले. प्रा. उमा खनाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.

Web Title: Kusumagraj's Poetry From Personality to Globalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.