श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:22 AM2019-06-03T00:22:36+5:302019-06-03T00:23:42+5:30

कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.

From the labor force, the water revolution in the village of Hivra | श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.
वॉटर कप स्पर्धेत केवळ ४१६ लोकसंख्या असलेल्या हिवरा गावाने सहभाग घेतला तो, जलदूत डॉ. उल्हास जाजू यांच्या सहकार्यामुळेच. पाणी असेल तर शेती टिकणार आणि पावसाच्या पाण्याने शेतातील माती वाहून जाईल तर सुपिक जमिनी नष्ट होईल, याकरिता पाणी व शेतमाती हे दोन्ही टिकवून ठेवणे गरजेचे होते. अशावेळी हिवरा येथील परस्परविरोधी तीन गटांना एकत्रित आणून त्यांच्यापुढे जलक्रांतीची संकल्पना मांडणे डॉ. जाजू यांच्याकरिता आव्हानच होते. पण, त्यांनी शेती व पाण्याचे महत्त्व पटवून देत संपूर्ण गाव श्रमदानाकरिता एकत्रित करून जलयोद्धा पथक तयार केले आणि तेथूनच खºया जलक्रांतीला सुरूवात झाली.
हिवरा गावापासून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या खोदकामाला सुरूवात झाली, हे काम अधिक गतीने व्हावे, म्हणून अख्खे गावच टोपले, टिकास, फावडे घेऊन कामाला लागले. एकीकडे ४६ अंशांच्या तापमानात ग्रामस्थांच्या शरीरातून घामाचे थेंब टपकत होते, तर दुसरीकडे मशिनीद्वारे खोदकाम सुरू होते. आठवडाभर केलेल्या परिश्रमानंतर नाल्यालाच पाझर फुटला, आज या नाल्यात सुमारे सहा ते सात फूट पाणी आहे.
हे श्रमदान येथेच थांबले नाही, तर पावसाच्या पाण्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाते अशा शेतकºयांच्या शेतात संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रमदान करून शेतात समतल बांध तयार केले. सुमारे २० शेतकºयांच्या ५० एकर शेतात बांध तयार केल्याने आता पावसाचे पाणी हे शेतातच मुरणार असून, शेतातील मातीही वाहून जाण्यास अटकाव होणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीने धनी असलेल्या हिवरा ग्रामस्थांनी श्रमदानातून गावालगतच्या शेतात, शासकीय जमिनीवर विविध आकाराचे तब्बल सात तलावांची निर्मिती केल्याने पाऊसपाण्याच्या संवर्धनासोबत मातीचेही संवर्धन होणार आहे.

जल है तो कल है, हे सर्वांना ज्ञात तर होते; पण आपण अशी काही क्रांती करू शकतो, यापासून ग्रामस्थ दूर होते. आज गावात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारणही ग्रामस्थच आहे. आठ वर्षांपासून तर ६० वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी श्रमदानात घाम ओतला. डॉ. जाजू यांच्या मार्गदर्शनामुळेच हिवरा हे गाव सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभागी आहे. पुरस्काराच्या रकमेच्या अपेक्षेपेक्षा गावाने आज एकत्रित होत जलक्रांती घडवून आणली. त्यामुळे आगामी शेकडो वर्ष गावापासून पाणीप्रश्न दूर राहणार आहे.
अक्षय बाळसराफ, जलयोद्धा टीम, हिवरा.

स्वास्थ्य सेवा हे माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचायला. स्वास्थ्याचे प्रश्न सुटले तर गावाचे प्रश्न सुटतात, असे नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न पोटाशी, शेतीशी संबंधित आहे. गावकरी जर उभा राहायचा असेल तर शेतीच्या जोरावरच उभा राहू शकतो आणि शेतीला आवश्यक आहे पाणी. शासनासोबतच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीला हिवरा ग्रामस्थांकडून मिळालेली श्रमदानाची साथ, यामुळेच जलक्रांती होऊ शकली.
डॉ. उल्हास जाजू, जलदूत

Web Title: From the labor force, the water revolution in the village of Hivra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.