क्रेन पडल्याने मजूर दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:46 PM2019-05-08T23:46:41+5:302019-05-08T23:47:06+5:30
वायगाव (हळद्या) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेन घसरली. यात दबुन मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. भोजराज वसंत सोनटक्के (३०) रा. वाघोली, असे मृतकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : वायगाव (हळद्या) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेन घसरली. यात दबुन मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. भोजराज वसंत सोनटक्के (३०) रा. वाघोली, असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वायगाव (हळद्या) येथील महिला शेतकरी उषा वसंत चांभारे यांच्या शेतात वाघोली येथील भोजराज सोनटक्के, नामदेव वानखेडे, प्रविण ढगे, सुरज वानखेडे, देवीदास तपासे, गजानन बुरांडे विहीर खोदण्याचा ठेका घेतला होता. बुधवारी सकाळी विहीर खोदण्याचे काम सुरू असताना विहिरीच्या आत भोजराज सोनटक्के, नामदेव वानखेडे, सुरज वानखेडे, गजानन बुरांडे होते. विहिरीतील खोदकाम केलेली माती व खडक क्रेनच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढले जात होते.
दरम्यान अचानक क्रेनचा तार निसटून क्रेन विहिरीत कोसळली. यात भोजराज गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.