विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
By admin | Published: September 30, 2014 11:40 PM2014-09-30T23:40:16+5:302014-09-30T23:40:16+5:30
काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.
घोराड : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. सततच्या या त्रासाने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. वीज वितरणचे कर्मचारी तक्रारीकडे डोळेझाक करीत असल्याच्या प्रत्यय येथील शेतकऱ्यांना येत आहे.
या क्षेत्रात कर्मचाऱ्यांकडे काम अधिक आणि कर्मचारी कमी अशी अवस्था आहे. यामुळे कृषीपंपाच्या तक्रारीचे निरसन तातडीने होत नाही. तक्रार निकाली काढण्याकरिता किमान दोन दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. हे चित्र तालुक्यातील प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. हिंगणी मौज्यातील रोहित्रावर केळझर फिडरवरून पुरवठा केला जातो. जवळपास १७ कि.मी अंतरावर हे फिडर असून ते वारंवार बंद असते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार या समस्येचा सामना करावा लागतो. घोराड येथील शेतकऱ्यांना तांत्रिक बिघाड आल्यास कोलगावच्या लाईनमनला संपर्क साधावा लागतो. विद्युत पुरवठा वारंवार बंद राहत असल्याने पिकांचे ओलित होत नसल्याने आर्थिक भुर्दंड तर पडतोच पण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या निकाली काढण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देऊन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)