कापसाच्या उत्पादनात २१ लाख क्विंटलने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:12 PM2018-03-04T23:12:27+5:302018-03-04T23:12:27+5:30
यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे. ही आवक गत वर्षीच्या तुलनेत थोडी थोडकी नाही तर तब्बल २१ लाख क्विंटलने घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
जिल्ह्यात असलेल्या बाजार समितींत आतापर्यंत १६ लाख ७२ हजार ७४० क्विंटल कापसाची आवक झाली आहे. यात खासगी व्यापाºयांची खरेदी १६ लाख ७२ हजार २७६ क्विंटल तर शासनाची ४६४.९६ क्विंटल एवढी असल्याची नोंद झाली आहे. या तुलनेत गत हंगामात वर्धेत व्यापाºयांकडून ३७ लाख ६७ हजार ६१९.७९ क्विंटल तर शासनाकडून ६ हजार ७४.५५ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. दोन्ही हंगामाचा विचार केल्यास जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत २१ लाख ९५३.३८ क्विंटलने आवक घटल्याचे दिसत आहे.
यंदाच्या खरीपात कापूस उत्पादकांकडून अडीच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यातच जिल्ह्यात ओलीताचे प्रमाण वाढल्याने कापूस उत्पादक चांगले उत्पन्न होईल, अशी आशा बाळगून होते. मात्र कापूस निघण्याच्या काळात कपाशीवर झालेल्या बोंड अळीच्या हल्ल्याने त्यांच्या आशा, अपेक्षा धुळीस मिळाल्या. यातच शेतकºयांना मदतीचे आश्वासन दिले असून ते केव्हा पूर्णत्त्वास जाते याकडे त्यांच्या नजरा आहेत.
उत्पन्न कमी तरी भाव पडले
उत्पन्न कमी असल्यास भाव चढण्याचा आतापर्यंतचा अर्थशास्त्राचा नियम यंदा मात्र खोटा ठरत असल्याचे बाजार समितीच्या चित्रावरून दिसत आहे. कापसाचे उत्पादन कमी झाल्याने बºयापैकी दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र बाजारात आज ४८०० ते ५२०० रुपयांच्या घरातच कापसाला भाव मिळत आहे. किडीच्या प्रादुर्भावमुळे हातचे उत्पादन गेले आणि व्यापाऱ्यांच्या मर्जीमुळे भाव पडले. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घरचा कापूस संपला
भाव वाढीच्या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी घरी कापूस ठेवला होता. मात्र या कापसामुळे शेतकºयांना आंगावर खाज येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस बाजारात काढला. असे असतानाही फेब्रुवारी अखेरपर्यंत झालेल्या आवकीवरून कापूस उत्पादनात जिल्ह्यात कमालीची घट झाली, असेच दिसत आहे.
यंदा शासकीय खरेदीला पाठ
कापूस उत्पादक शेतकºयांना किमान हमीभावाची तरी हमी असावी याकरिता कापूस पणन महासंघ व कॉटन फेडरेशन इंडिया यांच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यात पणन महासंघाच्या केंद्रांवर मुहुर्तालाही कापूस मिळाला नाही. तर सीसीआयच्या केंद्रांवर ४६४.९६ क्विंटलची आवक झाली आहे.