बसफेऱ्यांअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:16+5:30
कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
तारासावंगा : परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेकांना पर्याय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. यामुळे खासगी वाहनाचे मालक अव्वाच्या सव्वा दर आकारून नागरिक व विद्यार्थ्यांची सर्रास लूट करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दिवसात आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.
कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे.
परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात. खासगी वाहनाव्यतिरिक्त पर्याय नसल्याने नागरिकांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना गाडीत डांबून बसविले जाते. यामुळे अपघाताचा धोकाही बळावला आहे.
दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अनेक नागरिकांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बंदचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येते. काही विद्यार्थी तर चक्क पायदळ किंवा सायकलने शाळेपर्यंत अंतर गाठताना दिसतात.
हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडीत विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच खासगी वाहनाच्या प्रतीक्षेत बसावे लागते. प्रवासाचे दरही दीड-दोन पट वाढल्याने हातमजुरी, शेती करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोग्या नाही. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर एवढा मोठा संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याने आता तरी आमची लालपरी सुरू व्हायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बसफेरी बंद असल्याने दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. वेळेवर शाळेत देखील पोहोचता येत नाही. खासगी वाहनात एक प्रकारचे मोठे संकट डोक्यावर घेऊनच प्रवास करावा लागतो. प्रवासाचे भाडेही ठरले नाही. त्यामुळे आमची लूट चालवली जात आहे.
- भावना गावंडे, विद्यार्थिनी.
बंद बसफेऱ्या अभावी दररोज मुलांना शाळेत खासगी वाहनाने पाठवावे लागते. त्यामुळे मुले शाळेतून परत घरी येईपर्यंत मनात एक प्रकारची भीती असते.
- अरुण वंजारी, पालक.