नाल्यांचा अभाव धोकादायक
By admin | Published: May 30, 2015 12:08 AM2015-05-30T00:08:45+5:302015-05-30T00:08:45+5:30
शहराची लोकसंख्या लाखाच्या वर पोहोचली आहे; पण सांडपाण्याची व्यवस्था व्हायला बराच वेळ लागला.
पावसाळ्यात होणार त्रास : नगर पालिकेत नियोजनाचा अभाव
हेमंत चंदनखेडे हिंगणघाट
शहराची लोकसंख्या लाखाच्या वर पोहोचली आहे; पण सांडपाण्याची व्यवस्था व्हायला बराच वेळ लागला. सध्या मोठ्या प्रमाणात नाल्यांचे काम सुरू असले तरी जुन्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. विशेष म्हणजे, शहरातील जुनी वस्ती अत्यंत दाट आहे. तेथे फारशा नाल्या नाहीत. त्यांची नियमित सफाईदेखील होत नाही. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यास मार्गच नाही. नाल्यांचा हा अभाव पावसाळ्यात नागरिकांना धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जुन्या वस्तीतून वाहणारा ‘मोती नाला’ सर्व लहान नाल्यांना सामावून घेत नदीकडे मार्गक्रमण करतो; पण नगर रचनेनुसार नाल्याचे नियोजन नसल्याने पावसाच्या पाण्यानेच नाल्या स्वच्छ होतात. अन्य वेळी कुणी गांभीर्याने घेत नाही. बऱ्याच नाल्या बुजलेल्या आहेत. त्यात कचरा, माती, प्लास्टिकचा ढीग साचला असल्याने पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. यंदा पावसाळा वेळेवर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यासाठी नगर पालिकेने नियोजन केले असले तरी बुजलेल्या, प्लास्टिक पिशव्या व पन्न्यांच्या कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरातील नव्या वस्तीत नाल्यांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले असून जुना वस्तीच्या तुलनेत त्यांची अवस्था चांगली आहे; पण अनियमित सफाई हाच कळीचा मुद्दा आहे. उन्हाळ्यात याचा फारसा त्रास होत नसला तरी पावसाळ्यात बुजलेल्या नाल्या धोकादायक ठरतात. जुन्या वस्तीतील नाल्या अतिक्रमणात दबल्या आहेत. काही नाल्यांची अवस्था वाईट असून पडक्या अवस्थेत आहे.
जुन्या वस्तीतील लोकमान्य टिळक चौक ते गाडगेबाबा वॉर्ड या रस्त्यावरील नाल्यांची अवस्था वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी बांधकाम नसून काही फुटलेल्या आहेत. नाल्याही अत्यंत लहान आकाराच्या असून बऱ्याच लांब अंतरापर्यंत जातात. यामुळे पावसाळ्यात साचलेले क्षमतेपेक्षा अधिक पाणी रस्त्यावरून वाहते. हनुमान वॉर्ड, डांगरी वॉर्ड, गौतम वॉर्ड, सेंट्रल वॉर्ड, निशानपूरा या भागात नाल्यांची अवस्था चांगली नाही. सफाईही अनियमित होत असल्याची माहिती आहे. संत तुकडोजी वॉर्ड, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील नाल्या तर अनेक ठिकाणी कचऱ्यांनी तुंबल्या असून साफसफाईचे कुठलेही चिन्ह तेथे दिसत नाही.
शहरातील जुन्या वस्तीतून वाहणाऱ्या मोती नाल्यात बेशरमने कहर गाठला आहे. झुडपांची उगवण झाली असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शहरातील सांडपाणी वाहून नेणारा हा नाला अनेक ठिकाणी गाळाने बुजला आहे. हा मुख्य नाला वर्षभर साफ होत नसल्याचे दिसते; पण पावसाळ्यापूर्वी वर्षातून एकदा त्याच्या सफाईकडे लक्ष दिले जाते. काही भागात नाल्याची तुटफूट झाली असून अतिक्रमणही वाढले आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
वर्षातून एकदाच होते नाल्याची सफाई
शहरातील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला अनेक ठिकाणी गाळाने बुजला आहे. काही ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले तर कुठे नाल्याची तुटफूट झाली आहे. यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. या नाल्याची वर्षातून एकदाच सफाई केली जाते. यामुळे वर्षभर त्या नाल्याच्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. शहरातील अन्य नाल्यांची स्थितीही अशीच आहे. कित्येक दिवस नाल्या साफ केल्या जात नसल्याने नागरिकांना घाणीच्या साम्राज्यातच खितपत राहावे लागते. जुन्या वस्तीमध्ये तर नाल्यांची दयनिय अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी जुन्या वस्तीमध्ये नाल्याच नसल्याचेही निदर्शनास येते. पालिका प्रशासनाने शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पावसाळा येणार असल्यामुळे नगर पालिकेने नियोजन केले आहे. नाला सफाईसाठी जेसीबीचा वापर करून जेथे शक्य नसेल तेथे मनुष्यबळाचा वापर करून सफाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील नाली सफाईचे कामही सुरू केले असून ६ जूनपर्यंत पावसापूर्वीचे काम पूर्ण होईल. त्यानंतरही कामे सुरू राहतील.
- अनिल जगताप, मुख्याधिकारी, नगर परिषद हिंगणघाट.