भिडी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:39 PM2018-08-10T23:39:10+5:302018-08-10T23:40:43+5:30
चैपदरी रस्ता बांधकामासाठी भिडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तीन वॉर्ड पाडण्यात आल्याने, जागेअभावी येथील काही विभाग बंद पडले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून याठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने एका वॉर्डाचे बांधकाम करून वेळ मारून नेली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : चैपदरी रस्ता बांधकामासाठी भिडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तीन वॉर्ड पाडण्यात आल्याने, जागेअभावी येथील काही विभाग बंद पडले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून याठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने एका वॉर्डाचे बांधकाम करून वेळ मारून नेली जात आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी रुग्णालयाचे अधीक्षक तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी व इतर काही पद अजूनही रिक्त असल्याने परिसरातील रुग्णांची हेळसांड होत आहे. महिला रुग्ण संकोच करीत आहे. या सर्व अडचणींवर मात करीत असताना येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश राठोड यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचा आंतररुग्ण विभाग, डिलेव्हरी वॉर्ड, आॅपरेशन थियेटर तसेच इतर काही भाग पाडण्यात आल्यामुळे तसेच नव्याने बांधकामाची तरतुद न झाल्यामुळे येथील काही विभाग ओस पडले आहे.
यामध्ये रुग्णालयातील अधीक्षक यांचा कक्ष कार्यालयातील तीन लिपीक व संणकाचा कक्ष औषधीकरिता स्टोअर रुम, रेकॉर्ड रुम, भौतिकोपचार कक्ष, समुपदेशक कक्ष, आयसोलेशन वॉर्ड, निर्लेखित वस्तू ठेवण्याकरिता कक्ष, दंत चिकित्सा अधिकारी यांचा रुग्ण तपासणीचा कक्ष, आशा रुम, १०८ रुम तसेच दर्शनी भागात चौकीदाराची राहण्याची व्यवस्था व रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेची व्यवस्था आदींचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
रुग्णालयाच्या आवारातील विहीर ग्राम पंचायतच्या मालकीची असल्याने दुर्लक्षित आहे. विहीरीचे बांधकाम पडके असल्याने अपघाताची शक्यता आहे. पाणी दूषित आहे. रुग्णालयाला पाणी पुरवठा करण्याचे दृष्टीने ही ग्रामीण रुग्णालयाचे अधीन करण्यात यावी अशी मागणी आहे. सदर रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने याठिकाणी अपघाताच्या रुग्णांसोबतच परिसरातील वीस किमी अंतरावरून रुग्णांची गर्दी असते. दररोज ३०० ते ३५० बाह्यरुग्णांची नोंदणी व उपचार होत असते. त्यामुळे आरोग्य विभागाने येथील सोयी सुविधांची दखल घ्यावी तसेच रुग्णालयाचे बांधकाम पाडल्याचा मोबदला म्हणून मिळालेल्या एक कोटी १० लाखांतून नवीन बांधकाम हाती घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोबल्याच्या रकमेवरून प्रशासकीय वाद उद्भवला
मिळालेल्या मोबदल्याच्या रकमेबाबत जिल्हा चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, पं.स. गटविस्तार अधिकारी कार्यालय तसेच महसुल कार्यालय असा घोळ न ठेवता येथील रुग्णालयाच्या बांधकामासाठी याचा उपयोग करण्यात यावा मोबदला म्हणून मिळालेल्या एक कोटी १० लाखातून या रुग्णालयाचे विस्तारीकरणाचे बांधकाम हाती घ्यावे अशी मागणी स्थानिकांची आहे. मात्र याबाबत अद्यापही शासकीयस्तरावर एकमत होत नसल्याचे चित्र आहे.