वसतिगृहात सुविधांचा अभाव

By admin | Published: December 22, 2016 12:28 AM2016-12-22T00:28:44+5:302016-12-22T00:28:44+5:30

उमरी (मेघे) येथील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसतिगृहात विविध ठिकाणचे विद्यार्थी प्रवेशित आहे;

Lack of facilities in the hostel | वसतिगृहात सुविधांचा अभाव

वसतिगृहात सुविधांचा अभाव

Next

विद्यार्थी हतबल : शैक्षणिक भवितव्य धोक्यात, कारवाईची मागणी
वर्धा : उमरी (मेघे) येथील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसतिगृहात विविध ठिकाणचे विद्यार्थी प्रवेशित आहे; पण येथे अनेक विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. आठवड्यात कधी-कधीच तासिका होतात. यामुळे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शिवाय अनेक सुविधांचा अभाव असल्याने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवासी शाळा असताना वसतिगृहात रात्री विद्यार्थीच असतात. कोणतेही कर्मचारी निवासी राहत नाहीत. गार्ड कधी राहतात तर कधी रात्री १० वाजता निघून जातात. गृहपालाचे पद रिक्त आहे. मुख्याध्यापक जबाबदारीने राहत नाहीत. रात्री केवळ विद्यार्थ्यांवर संपूर्ण इमारत सोपविलेली असते. निवासी शाळेतील विद्यार्थी संख्या १४५ आहे; पण एकही शारीरिक शिक्षक नेमलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना खेळांपासून मुकावे लागत आहे. त्यांची पीटी घेतली जात नाही. खेळण्याचे साहित्य नाही. शैक्षणिक सत्र संपत असताना अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला नाही. विद्यार्थी आपल्या घरून आणलेल्या कपड्यावरच शिक्षण घेत आहे. विद्यार्थी आजारी असल्यास त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यांना पाणी पिऊन झोपण्याचा वा वर्गात बसण्याचा सल्ला दिला जातो. नियमित आरोग्य तपासणी होत नाही.
वेळापत्रकानुसार जेवण दिले जात नाही. शिवाय भोजनाचा दर्जाही व्यवस्थित नाही. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास तुमच्या घरच्यापेक्षा येथील जेवण चांगले आहे, असा धमकीवजा समज देत त्यांना शांत केले जाते. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाही; पण कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी आठ व सुरक्षा कर्मचारी नऊ नेमण्यात आले. एकूण १७ कंत्राटी कर्मचारी आहेत. एवढ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज आहे काय, असे असल्यास विषयासंबंधी शिक्षक, पीटीआय व गृहपाल का नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळा सकाळी राष्ट्रगीत व प्रार्थनेने सुरू होते. एकंदरीत देशातील सर्वच शाळांत ही पद्धती आहे; पण येथे राष्ट्रगीत, प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहत नाही. कंत्राटी कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडतात. शाळेत प्रयोगशाळा व सहायकही नाही. या अनियमितता, अवस्थेमुळे १४५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरविंद खैरकार यांनी निवेदनातून दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

अन्नाचा दर्जाही निकृष्ट
निवासी शाळा, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते; पण त्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाही, हे सर्वश्रूत आहे. असाच प्रकार उमरी मेघे येथील निवासी शाळेत घडत असून येथील जेवणाचा दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केला आहे. या प्रकरणी कार्यवाहीची मागणी केली आहे.

 

Web Title: Lack of facilities in the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.