गुळगुळीत महामार्गावर सुविधांचा अभाव, ६० चक्का ट्रकचा पंधरवड्यापासून मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 04:43 PM2024-08-03T16:43:27+5:302024-08-03T16:45:30+5:30
हुसनापूर टोल नाक्यावरील प्रकार : दुचाकीस्वारांचे अपघात, व्यवस्थापकाचे दुर्लक्ष, वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
भिडी : प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते गुळगुळीत करण्यात आले. दिलेल्या सुविधेचा खर्च वसूल करण्यासाठी टोल नाके बांधण्यात आले. मात्र, या मार्गावरून अवजड वाहने जाण्याची सुविधाच नसल्याने गत पंधरवड्यापासून ६० चक्का ट्रकने टोल नाक्यावर मुक्काम ठोकला आहे. व्यवस्थापकाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंधरवड्यात काही दुचाकीचे अपघात झाले असून या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात ग्रामीण मार्गासह, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यात आले. यात हजारो कोटी रुपये खर्ची करून समृद्धी मार्गाचाही समावेश आहे. मात्र, या मार्गावरून इतिवहजड वाहनांना जाण्याची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांची मोठी दमछाक होत आहे. मथुरा येथून एनएलओ / एएच ०१०० क्रमांकाचा ६० चाकांचे अवडजड मालवाहू गिट्टी मिक्सर मशीन घेऊन नांदेड येथे निघाला. दरम्यान अनेक अडचणींवर मात करून हुसनापूर टोल नाक्यावर हे वाहन आले. मात्र, पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने या वाहनाला टोल नाक्यावरच मुक्काम करावा लागला आहे. गत १७ दिवसांपासून है वाहन एकाच ठिकाणी असल्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र, यात अजूनही टोल नाका व्यवस्थापकांनी यावर मार्ग काढला नसल्याने आणखी किती दिवस या ठिकाणी मुक्काम करावा, असा प्रश्न वाहन चालक, वाहकांपुढे पडला आहे. तातडीने यावर मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.
वाहनांनुळे अपघात
दुचाकी, तीनचाकी वाहनधारकांनी सुरुवातीलाच टोल वसूल करण्यात आल्याने या टोल नाक्यावरून त्यांना टोल शुल्क द्यावे लागत नाही. निःशुल्क वाहनांच्या रांगेशेजारी है अवजड वाहन उभे करण्यात आल्याने मार्ग काढताना अडचण होत आहे. यात काही दुचाकींना अपघात झाले. यात किरकोळ जखमा आल्याने थोडक्यात बचावले. मात्र, मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर है वाहन हटवावे अशी मागणी करण्यात आली. टोल व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आधुनिक विकासाची हीच शोकांतिका
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, हजारो कोट्यांवधी रुपये खर्ची घालून आधुनिक विकास साधला जातो आहे. एवढेच काय तर आपत्कालीन स्थितीत देशात विणलेल्या महामार्गावर फायटर जहाज, विमान उतविल्याचे प्रयोग करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे अतिवजड वाहनांना या मार्गावरून नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आधुनिक विकासाची ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.