विदर्भातून गुरुपौर्णिमेसाठी शेगावला पाठविणार लाडूचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 08:51 PM2023-05-27T20:51:41+5:302023-05-27T20:52:18+5:30
Nagpur News गुरुपौर्णिनेनिमित्त शेगाव येथे वितरीत होत असलेल्या प्रसादाकरिता लागणारे साहित्य पाठवायचा संकल्प करण्यात आला आहे. राज्याच्या २७ केंद्रांवरून हे साहित्य शेगाव येथे पोहचविले जाणार आहे.
वर्धा : गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याठिकाणी भाविकांना दररोज प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू दिले जातात. यासाठी लागणारे साहित्य गुरुदक्षिणा म्हणून पाठविण्याचा संकल्प वर्धा येथील गजाननभक्त प्रशांत महल्ले यांनी केला आहे. राज्याच्या २७ केंद्रांवरून हे साहित्य जमा करून ते गुरुपौर्णिमेपूर्वी शेगाव येथे पोहोचविले जाणार आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाउलींना गुरुदक्षिणा म्हणून शिधा पोहोचवावा ही संकल्पना प्रशांत महल्ले यांना सुचली व त्यांनी वर्धा, नागपूर शहरातील गजाननभक्तांशी चर्चा करून या उपक्रमाला मूर्तरूप दिले. बुंदीचा लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जमा करून ते गजानन महाराज मंदिरात पोहोचविण्याचे काम २२ ते ३० जून या कालावधीत केले जाणार आहे. त्यामुळे दररोज शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात प्रसादात दिला जाणारा बुंदीचा लाडू तयार करण्याच्या उपक्रमाला या भक्तांचे मोठे सहकार्य लाभणार आहे. यासाठी नागपूर शहरात १४ केंद्र उघडण्यात आली असून, राज्यात २७ केंद्रांवर बुंदी लाडूसाठी लागणारे साहित्य (चणाडाळ, साखर, तूप, सुकामेवा) जमा केले जाणार आहे. व २ जुलै रोजी विशेष ट्रकने हे साहित्य शेगावला गजानन महाराजांच्या समाधिस्थळी अर्पण केले जाणार आहे.