गावकऱ्यांनी केले तलावाचे पाणी कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:00 PM2018-11-01T16:00:07+5:302018-11-01T16:02:15+5:30
कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात दुष्काळाची गडद छाया असल्याने शासनाने दुष्काळसदृष्य तालुके जाहीर केले असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने भविष्यकालीन उपाययोजना म्हणून दृष्काळसदृष्य कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे.
वर्ध्याच्या कारंजा तालुक्याचा समावेश दुष्काळाच्या यादीत करण्यात आला आहे. या तालूक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावर वसलेल्या ठाणेगावात जिल्हा परिषदच्या लघूसिंचन विभागाने सुमारे ४० वर्षापूर्वी पाणी साठवण तलावाची निर्मिती केली. या दिर्घ कालावधीत तलावाचा कालवा अनेक ठिकाणी बुजला आणि नादुरुस्तही झाला होता. त्यामुळे या तलावाची २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेतून दुरूस्ती करण्यात आली. ४ किलोमीटर कालव्याचे खोलीकरण करण्यात आले. तलावाचे देखील खोदकाम करून गाळ उपसण्यात आला. या तलावात ५८२ सहस्त्र घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता असून आज तलावात अंदाजे ५५० सहस्त्र घनमीटर म्हणजे आॅक्टोबर महिन्यात ९० टक्के पाणी शिल्लक आहे. जे यंदा रबी पिकाला फायदा देणारे ठरणार आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असल्याने गावकुसाबाहेर असलेल्या तलावाचा व्हॉल्व कुणीही उघडून पाणी चोरी करण्याची अथवा पाणी वाया घालवण्याची भीती आहे. म्हणून पाण्याचे महत्व जाणत ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी पुढकार घेत लघूसिंचन विभागाच्या सूचनेनुसार हेड रेग्यूलेटरलाच कुलूप लावले. त्यामुळे आता पाण्याची गळती व चोरी थांबून दुष्काळाला रोखण्यास मदत होणार आहे.
पाण्याचे नियोजन ग्रामपंचायतकडे
लघूसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने स्वत: खर्च करत तलावाचे पाणी कालव्यात सोडण्याचे ठिकाण म्हणजेच हेड रेग्यूलेटर व्हॉल्वला लोखंडी पेटी लावली. सोबतच त्या पेटीला २ कुलूप लावण्यात आले. या कुलुपांची चावी ग्रामपंचायतने स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे हेड रेग्यूलेटरला कुलूप लावल्याने पाणी चोरी, अपव्ययाला आळा बसण्यास मदत झाली. हा तलाव ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आला असून पाणी वाटपाचे नियोजन ग्रामपंचायत मागणीनुसार करणार आहे.
पहिल्यांदाच कुलूपंबद विमोचकाची व्यवस्था
च्ठाणेगाव लघुसिंचन तलावाचे जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत दुरुस्ती काम केले आहे. या तलावाची साठवण क्षमता ५८२ स.घ.मी. असून १०० हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्जीवित केले आहे. अपुऱ्या पावसामुळे पुढील काळामध्ये उद्भवणाºया परिस्थितीचा सामना करण्यासाठी व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने तंटामुक्त उपयोग करण्यासाठी कुलूप बंद विमोचकाची व्यवस्था केलेली आहे. कुलूप बंद विमोचकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन पहिल्यांदाच केल्याने इतर लघु सिंचन प्रकल्पांवर देखील अशाप्रकारे पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त ठरेल.