जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना

By विजय.सैतवाल | Published: February 18, 2024 11:51 PM2024-02-18T23:51:41+5:302024-02-18T23:52:21+5:30

या प्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lakhs of lime to the government by fake signature of Tehsildar on land sale permit and order | जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना

प्रतिकात्मक फोटो...

जळगाव : नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवाटा वर्ग एकमध्ये रुपांतर करुन कृषिकसाठी विक्री परवानगी पत्रावर तसेच विक्री परवानगी आदेशावर महसूल सहाय्यकाने तहसीलदारांची बनावट सही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपये महसुली रकमेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवाटा वर्ग एकमध्ये रुपांतर करून कृषिकसाठी विक्री परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शेतकऱ्याने अर्ज केला होता. त्यानुसार सदर मिळकतीच्या बाजारभावाच्या मूल्यांकन रकमेच्या ७५ टक्के रक्कम तीन लाख २६ हजार २५२ रुपये सरकारी खजिन्यात जमा करण्याविषयी संबंधित शेतकऱ्यांना २७ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या सहीनिशी कळवण्यात आले होते.

त्यानंतर मात्र संबंधित अर्जदारांना ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजारभाव मूल्यांकन रकमेच्या ५० टक्के रक्कम दोन लाख २४ हजार १६३ रुपये सरकारी खजिन्यात जमा करण्याबाबत कळवण्यात आल्याचे तसेच या पत्रावर तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांनी स्वाक्षरी नसून ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने अव्वल कारकून गणेश हटकर यांनी नंदुरबार येथे बदली झालेल्या लोखंडे यांना कळवले. त्यांनी जळगावला येऊन या प्रकाराची पाहणी केली असता स्थळ पत्रावर स्थळ प्रत नमूद करताना महसूल सहाय्यक गजानन नरोटे याने तहसीलदारांच्या पदनामाच्या बाजूला स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. या शिवाय सदर जमीन  विक्री परवानगी आदेशावरदेखील बनावट स्वाक्षरी असल्याचे आढळून आले.

या सोबतच रावेर तालुक्यातील जिन्सी येथील जमिनीसाठी केलेल्या अर्जाविषयी संचिका जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-ऑफिस प्रणालीमध्ये प्रलंबित असताना ऑफलाईन पद्धतीने तहसीलदार लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी करून आदेश देण्यात आल्याचे आढळून आले आहे.

ज्याची जबाबदारी त्यानेच केल्या बनावट स्वाक्षरी
संचिकेसंदर्भातील सर्व कामकाज व संचिकेचे अभिलेख जतन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेतील महसूल सहाय्यक गजानन नरोटे यांची असल्याने त्यांनी तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांना कोणतीही माहिती न देता २३ ऑक्टोबर २०२३ ते २ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान बनावट स्वाक्षरी करून शासनाच्या जमीन महसूल रकमेचे नुकसान केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी तहसीलदार पंकज लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम देशमुख करत आहेत.

Web Title: Lakhs of lime to the government by fake signature of Tehsildar on land sale permit and order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.