लालपरीला बसस्थानकाची ‘अॅलर्जी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:28 PM2018-07-04T23:28:46+5:302018-07-04T23:30:38+5:30
सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
येथे जागतिक स्तरावरील प्रसिद्ध महात्मा गांधीजींचे आश्रम आहे. देश विदेशातील पर्यटक आणि दर्शनार्थी मोठ्या संख्येनी भेट देतात. तसेच अध्ययनासाठी येत असतात. ऐवढेच नाही तर बापुरावजी देशमुख अभियांत्रिकी आणि यशवंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यात बहुसंख्य विद्यार्थी सामान्य परिवारातील असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने येणे जाणे करतात. यात अन्य प्रवाशांचा समावेश आहे. पण लालपरीला बसस्थानकाची अॅलर्जी असल्याने काही बसेस रोडवर थांबून पुढे जातात. यावर प्रवाशांची तीव्र नापसंती दर्शविली आहे.
१५ आॅगस्ट १९९८ मध्ये राज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते बसस्थानकाचे उद्घाटन झाले. सेवाग्राम मार्गे वर्धा ते समुद्रपूर, चिमूर व परत अशा दिवसाला साधारण ४४ व सुपर बसेस ५ अशा फेऱ्या आहेत. बसच्या फेऱ्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत सुरू असतात.
महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी बसस्थानक बनविले. या ठिकाणी बसेस आल्या तर सर्व प्रवाशी बसस्थानकात बसणार पण बरेचदा बस रस्त्यावर थांबत असल्याने प्रवाशी झाडाखाली थांबणे, पुलावर बसणे, पसंत करतात. विद्यार्थी प्रवाशांची संख्या यात सर्वाधिक आहे. बसस्थानकावर बसगाड्या न आणता रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.