इंझापूर शिवारातील जमीन पोखरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 05:00 AM2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:09+5:30
कंपनीने परिसरातील टेकड्या व शेतकऱ्यांच्या जमिनीला पोखरायला सुरुवात केली आहे. काही शेतकरीही चार पैसे मिळावे याकरिता कंपनीला मुरमासाठी शेती देत आहे. बोरगाव (मेघे) परिसरात वर्धा नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. त्याच्या मागील बाजूस इंझापूर शिवारात एक ले-आऊट असून तेथून टॉवर लाईनही गेली आहे. विशेषत: परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना जाण्याचा तेथून मार्गही आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : जिल्ह्यात रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरणाची कामे सुरू असल्याने या मार्गांसाठी मुरमाचीही मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीकडून परिसरातील टेकड्या व शेती पोखरायला सुरुवात केली आहे. असाच काहीसा प्रकार मागील काही दिवंसापासून बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून उत्खनन चालविल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
वायगाव (निपाणी) ते बोरगाव (मेघे) या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गाची उंची वाढविण्यात आली असून याकरिता मुरमाची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे कंपनीने परिसरातील टेकड्या व शेतकऱ्यांच्या जमिनीला पोखरायला सुरुवात केली आहे. काही शेतकरीही चार पैसे मिळावे याकरिता कंपनीला मुरमासाठी शेती देत आहे. बोरगाव (मेघे) परिसरात वर्धा नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. त्याच्या मागील बाजूस इंझापूर शिवारात एक ले-आऊट असून तेथून टॉवर लाईनही गेली आहे. विशेषत: परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना जाण्याचा तेथून मार्गही आहे. टॉवर लाईन, रस्ता किंवा ले-आऊट असेल अशा परिसरात गौणखनिज उत्खननाकरिता परवानगी मिळत नाही. शासनाचा तसा नियम आहे. असे असतानाही शेतकऱ्यांने शेततळ्याच्या नावावर मुरूम काढण्यासाठी शेत कंपनीला दिल्याची माहिती आहे. कंपनीनेही सर्व नियम धाब्यावर बसवून शेत पोखरायला सुरुवात केली आहे. जवळपास एकरभर मोठा खड्डा तयार केला असून आता शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच तेथील टॉवरपर्यंत खोदकाम करण्यात आल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या खड्डयात पाणी साचून हा खड्डा परिसरातील शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीही धोकादायक ठरणार असल्याची ओरड होत आहे.
कालावधीनंतरही खोदकाम सुरूच
इंझापूर येथील या शेतातून कंत्राटदार कंपनीला ३ हजार ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली होती. या कालावधीतच कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन केले. त्यामुळे काहींनी याप्रकरणी तहसीलदारांकडे तक्रारीही केल्या होत्या. तक्रारीअंती काही काळापर्यंत खोदकाम थांबविण्यात आले होते. येथील उत्खननाची परवानगी ११ जानेवारी २०२० रोजी संपली असतानाही पुन्हा उत्खनन सुरूच आहे. असे असताना तक्रारकर्तेही आता गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मुरूम चोरट्यांकडून टेकडीही गिळंकृत
इंझापूर परिसरात कंपनीने उत्खनन केलेल्या शेताच्या वरच्या बाजूस टेकडी आहे. ही टेकडीही पोखरल्याचे दिसून आले. राजकीय वरदहस्त असलेल्या काही व्यक्तींकडूनच या टेकडीचा मुरूम चोरला जात असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पहाटेपर्यंत येथून ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरुमाची चोरी होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून मुरुम चोरटे रग्गड होत आहे. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.