गावची जमीन गावातीलच भूमिहिनांना द्यावी
By admin | Published: January 4, 2017 12:34 AM2017-01-04T00:34:42+5:302017-01-04T00:34:42+5:30
गावात शासनाकडे मोठी जमीन आहे. या जमिनीचे पट्टे मिळावे, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी ग्रा.पं. कडे केली होती.
ग्रामसभेत ठराव घ्यावा : भूमिहिन नागरिकांची मागणी
टाकरखेड : गावात शासनाकडे मोठी जमीन आहे. या जमिनीचे पट्टे मिळावे, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी ग्रा.पं. कडे केली होती. यावरून शासकीय जमीन गावातील भूमिहीन नागरिकांनाच देण्यात यावी, असा ठराव ग्रा.पं. ने विशेष ग्रामसभा बोलवून घ्यावी. याबाबत संबंधित महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी केली आहे.
गजानन हांडे व ग्रामस्थांनी लेखी निवेदनातून गावातील शासकीय जमिनीवर स्थानिकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे याबाबत ग्रा.पं. ने ग्रामसभा घेत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रस्ताव देण्याची मागणी केली आहे.
मौजा टाकरखेड येथील बरीच जमीन शासनाकडे जमा आहे. यातील काही जमीन बाहेरगावातील लाभार्थ्यांना देण्यात आली; पण गावातील भूमिहीन जमिनीपासून वंचित आहे. या गावातील जमीन बाहेर गावातील धरणग्रस्त, माजी सैनिकांना देण्यात आली. काही जमीन वाहतीत आहे तर काही दुसऱ्याला मक्त्याने देण्यात आली. काही पडिक आहे. जे स्वत: राबत नाही, ज्यांना गरज नाही, अशाांना जमिनी देऊन उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ती जमीन गावातील भूमिहीन नागरिकांना मिळाली असती तर त्यावर त्यांचा उदरनिर्वाह झाला असता.
गावात मोठ्या प्रमाणात भूमिहीन नागरिक आहे. मजुरीवर प्रपंच्याचा गाडा चालविणे अवघड असल्याने त्यांना दुसऱ्याची जमीन मक्त्याने करून दिवस काढावे लागत आहे. ज्यांना जमीन मिळाली, ते दुसऱ्याला लावून देतात; मग, अशा लाभार्थ्यांना जमीन देऊन उपयोग काय, त्यापेक्षा गावातील जमीन गावातील भूमिहीन नागरिकाला दिल्यास त्याचा खरा उपयोग होईल. यामुळे आता उर्वरित असलेली शासकीय जमीन व पडिक जमीन गावातील भूमिहीनांना देण्यात यावी, असा ठराव ग्रामपंचायतीने घ्यावा आणि संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी लेखी निवेदनातून भूमिहीनांद्वारे करण्यात आली आहे.(वार्ताहर)